
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील आटलेला पाणीसाठा, त्यात मुंबईला विविध प्रकल्पांसाठी पाणीपुरवठा करणारे 1800 टँकर्स संपावर गेल्याने मुंबईत पाणीटंचाईची धग तीव्र झाली आहे. त्यामुळे मुंबईवर घोंगावणारे जलसंकट कसे टाळणार ते जाहीर करा, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना आज केला.
मुंबईत पाणीटंचाईची समस्या तीव्र झाल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी बुधवारी महापालिका मुख्यालयात जाऊन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली होती. यावेळी मुंबईकरांना सहन कराव्या लागत असलेल्या पाणीटंचाईबाबत त्यांनी पालिका आयुक्तांना अवगत केले होते. मात्र आजपासून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त मुंबईकरांना 300 दशलक्ष लिटर्सचा पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई टँकर्स असोसिएशनने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे पाणीटंचाईत भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आज सोशल मीडिया ‘एक्स’वर पोस्ट करत पालिका आयुक्तांना धारेवर धरले आहे.
राज्य सरकार निष्क्रिय
केंद्र सरकारच्या भूजल प्राधिकरणाने जारी केलेल्या नियमांबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आपली भूमिका मांडली नाही. राज्य सरकारने त्यासाठी गेल्या तीन वर्षांत काहीच हालचाल केली नाही. त्यात आता या नियमांना विरोध म्हणून टँकर्सचालक संपावर गेले आहेत. दिल्लीत पेंद्रीय कार्यालयात बसलेल्यांनी अशा प्रकारे अव्यवहारी नियम बनवल्याने त्याचा ताप मुंबईकरांना भोगावा लागत आहे, असा आक्षेप आदित्य ठाकरे यांनी केला.
पालिकेने दाहकता सांगावी
मुंबईकरांना सध्या मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या चिघळत चालली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची दाहकता आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील याची माहिती पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना सांगावी, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना केले आहे.
…तर मुंबईचा पाणीप्रश्न मिटला असता!
महाविकास आघाडीने पुढाकार घेऊन मुंबई महापालिकेच्या वतीने बोरिवली येथील गोराई येथे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा प्रकल्प मंजूर केला होता. हा प्रकल्प ‘एसंशिं’ सरकारने रद्द केला नसता तर मुंबईचा पाणीप्रश्न 2026 पर्यंत कायमचा मिटला असता, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.