
वाढत्या प्रदूषणामुळे केसांचे आरोग्य हे खऱ्या अर्थाने धोक्यात आलेले आहे. सध्याच्या घडीला केस गळणे, तुटणे आणि दुभंगणे या समस्या सर्वांमध्येच वाढत आहेत. एकेकाळी मुलींचे सर्वसाधारण केस हे कंबरेपर्यंत असायचे. परंतु आज केस वाढण्याचे प्रमाण हे दिवसागणिक खूप कमी झालेले आहे. आपण शॅम्पोच्या नावाखाली रसायनांचा अतिवापर केसांवर करत आहोत. त्यामुळे केसांच्या समस्या या आपल्याला सतावत आहेत. त्यामुळेच आता बॅक टू बेसिक्स या गोष्टींकडे लक्ष देण्याची आपल्याला गरज आहे.
बॅक टू बेसिक्स म्हणजे जुन्या काळातील नुस्खे आता आपण आजमवण्याची वेळ आलेली आहे. जुन्या काळी कोणतेही शॅम्पो नव्हते, अशावेळी केस कशाने धुवायचे हा प्रश्न निर्माण व्हायचा. त्यामुळेच जुन्या काळातीलच एक उत्तम उपाय केसांसाठी होता तो म्हणजे रीठा शिकेकाई पावडर. रिठा शिकेकाई पावडर हा एक उत्तम पर्याय जुन्या काळी केसांसाठी वापरला जायचा.
रीठा आणि शिकेकाईमुळे केस गळण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात कमी होत असे. केवळ इतकेच नाही तर, हा सर्वात स्वस्त पर्यायही मानला जातो. त्यामुळेच रीठा आणि शिकाकाई पावडर हा सध्याच्या घडीला बेस्ट पर्याय म्हणून पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे.
केसांसाठी रीठा आणि शिकाकाई पावडर बनवण्यासाठी साहित्य
आवळा पावडर – 3 ते 4 चमचे
रीठा – 4 चमचे
शिकाकाई पावडर – 4 चमचे
कडुलिंब पावडर – 1 लहान वाटी
केसांच्या समस्यांवर उत्तम उपाय म्हणून पावडर बनवण्यासाठी एक मोठी वाटी घ्या. या भांड्यात आवळा पावडर, रीठा आणि शिकाकाई पावडर घाला आणि मिक्स करा. या मिश्रणात कडुलिंबाची पावडर घाला आणि चांगले मिसळा. तुमची पावडर केसांना लावण्यासाठी तयार आहे. ते पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवा.
ही पावडर वापरण्यापूर्वी, तुमचे केस चांगले धुवा आणि वाळवा. केस धुण्यामुळे केसातील घाण आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत होते. आता एका लहान भांड्यात 2 चमचे तयार पावडर घ्या आणि त्यात पुरेसे पाणी मिसळून द्रावण तयार करा. द्रावण तयार करताना, ते जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. पावडरचे द्रावण तयार केल्यानंतर, ते टाळूवर आणि केसांना लावावे. हे द्रावण लावल्यानंतर, ते शॉवर कॅपने झाकून 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर केस पाण्याने आणि सौम्य शाम्पूने स्वच्छ करा. केसांच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा ही पावडर वापरू शकता.