पालकांनो तुमच्या मुलांना उत्तम माणुस बनविण्यासाठी ‘या’ टिप्सचा वापर करा

आपल्यापैकी कुणीच हे परफेक्ट नसते. परंतु परफेक्ट होण्यासाठीचा प्रयत्न मात्र आपण सवयींच्या माध्यमातून नक्कीच करु शकतो. मुलांना परफेक्ट बनविण्यासाठी अनेक पालकांचा आटापिटा पाहायला मिळतो. 
 
तुम्हालाही समाजामध्ये उत्तम पालक असल्याचे बिरुद अभिमानाने मिरवायचे असेल तर, मुलांसाठी काही गोष्टी करणे या खूप गरजेचे असेल. मातीच्या गोळ्याला आकार देताना सर्वात आधी चिखलावर खूप मेहनत घेतली जाते. त्याचप्रमाणे सर्वात आधी पालकांनी स्वतःवर काम करणे कसे गरजेचे आहे हे आपण जाणून घेऊया. 
उत्तम रोल माॅडेल बना
एखादी गोष्ट मुलांना सांगताना, सर्वात आधी तुम्ही ती गोष्ट करुन बघा. मुले ही कायम पालकांना बघत असतात आणि त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे चांगल्या गोष्टी मुलांना शिकवताना आधी तुम्ही स्वतः ती गोष्ट करा. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांसाठी रोल माॅडेल म्हणून काम कराल. तुमच्यातील सकारात्मक बदल आणि वाटचाल ही मुलांच्या ग्रुमिंगसाठी खूप महत्त्वाची आहे हे कायम लक्षात ठेवा. 
 
सकारात्मक राहा
मुलांच्या मनावर कायम सकारात्मक गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न करा. सकारात्म गोष्टी मनावर बिंबवल्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तसेच मुलेही सकारात्मक विचार करु लागतात. सकारात्मक वागण्यामुळे मुलांचा मानसिक विकास उत्तम होण्यास मदत होते. 
 
संवाद साधा
मुलांसोबत पालकांनी वेळोवेळी संवाद साधणे हे खूपच गरजेचे आहे. संवाद साधल्यामुळे मुलांच्या मनात काय चलबिचल सुरु आहे हे पालकांना ओळखता येते. घरामध्ये असताना, मुलांशी विविध विषयांवर खुलेपणाने चर्चा करणे खूपच गरजेचे आहे. चर्चेमध्ये मोकळेपणा असल्यामुळे, मुले तुमच्याशी कुठल्याही गोष्टी लपवून ठेवणार नाहीत. 
 
मुलांशी वागताना काही तारतम्य बाळगा
आजही अनेक घरांमध्ये मुलांना ऐकले नाही तर, मारणे हा एक उत्तम पर्याय मानला जातो. मुलांना मारण्यापेक्षा त्यांना समजून घ्यायला शिका. त्यांच्यादृष्टीने काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे मुलांना पटवून द्या. 
 
मुलांची जडणघडण उत्तम कशी होईल यावर लक्ष केंद्रीत करा
मुलांची जडणघडण ही केवळ घरात होत नाही. तर समाजातील खूप सारे घटक हे मुलांच्या जडणघडणीमध्ये काम करत असतात. प्रत्येक मूल हे वेगळे असते, त्याची समजण्याची कुवत ही वेगळी असते. त्यामुळेच तुमच्या मुलाची कुवत काय आहे हे तुम्ही वेळोवेळी पडताळून पाहा.