Relationship- लग्नानंतर आयुष्यात गतकाळातील प्रेम समोर आल्यावर तुम्ही कसे सामोरे जाल…

जुन्या नात्यांनी आपल्या वर्तमानात पाऊल टाकल्यावर अनेकदा गोंधळायला होतं. हे असे गोंधळणारे क्षण तुमच्याही वाट्याला येत असतील तर या अशा गोष्टी परिपक्वपणे हाताळणं उत्तम ठरेल. नातं कोणतंही असो ते तुम्ही कसं हाताळताय यातच तुमची कसोटी असते. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडीयावर, शाहीद आणि करीना पुन्हा भेटले यावर चर्विताचर्वण सुरु झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा रंगली ती जुन्या प्रेमाची, जुन्या दिवसांची आणि जुन्या आणाभाकांची…

बाॅलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांच्यामध्ये ब्रेकअप होऊनही ते समोरासमोर भेटल्यावर उत्तमपणे सामोरे जातात. यामध्ये अगदी अलीकडचे नाव घ्यायचं झाल्यास, दीपिका आणि रणवीर कपूर हे नाव आवर्जून घ्यावं लागेल. दीपिका आणि रणवीर आजही भेटल्यावर एकदम मस्तपणे स्वतःला प्रेजेंट करतात. कुठेही जुन्या आठवणींचा उहापोह जगजाहीर न करता दीपिका आणि रणवीरने आदर्श वर्तणूकीने सर्वांचेच मन जिंकले आहे.

जुन्या प्रियकराची किंवा प्रेयसीची समोरासमोर भेट झाल्यावर, तुम्ही तो क्षण कसा हाताळता यावरच तुमची परिपक्वता सिद्ध होते. वर्तमानात जुने प्रेमसंबंध डोकावल्यावर, अनेकदा कालवाकालव होते. पुन्हा त्या क्षणांची उजळणी करताना, कानकोंडे झाल्यासारखे होते. ही अशी परिस्थिती उद्भवू न देता, योग्यपद्धतीने या गोष्टींना सामोरे गेल्यास हे असे क्षण फार जिव्हारी लागत नाहीत.

जुन्या प्रियकराला किंवा प्रेयसीला सामोरे जाताना तुम्ही स्वतःमध्ये हे बदल करा

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जुन्या नात्यांबाबत आजही संभ्रमात असाल तर, अशा नात्यांपासून दूर राहणे केव्हाही हितकारक ठरेल. तुमच्या वर्तमानातील आयुष्यावर जुन्या नात्यांचे प्रतिबिंब उमटू नये असे वाटत असल्यास थांबणं हेच तुमच्या नात्यासाठी उत्तम असेल.

अनेकदा जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देण्यासाठी तुमच्यामध्येही वयोमानापरत्वे परिपक्वता येणंही गरजेचं आहे. काळानुरुप झालेले एकमेकांच्या आयुष्यातील बदलांना योग्य पद्धतीने स्विकारल्यास, कोणतंही नातं हे ओझं वाटणार नाही याची काळजी तुम्हीच घ्यायला हवी.

जुन्या प्रियकराचा किंवा प्रेयसीचा तिरस्कार करण्यापेक्षा त्या नात्यातील आनंदाचे क्षण जपणे हे केव्हाही उत्तम ठरेल.

 

एकमेकांबद्दल अजूनही काही भावना असतील तर, त्या शांतपणे व्यक्त करणं हेच तुमच्या भविष्यासाठी उपयोगी ठरणार आहे. म्हणजे तुमच्या आत्ताच्या आयुष्यातही कुठेही उलथापालथ होणार नाही.

 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही नात्यात विनम्रता हवी. नात्यामधील विनम्रता हाच त्या नात्याच्या गाभा मानला जातो. त्यामुळेच जुन्या नात्यांच्या बाबतीत विनम्रता बाळगली तर, ती नाती ओझी वाटत नाहीत.