Periods- मासिक पाळीतील पाठदुखी, पोटदुखी आणि क्रॅम्पवर ‘हा’ चहा आहे एकदम फक्कड उपाय! वाचा, सविस्तर

प्रत्येक महिलेसाठी मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु अनेकदा मात्र मासिक पाळी ही खूप जणींसाठी त्रासदायक ठरते. काहीजणींना तर मासिक पाळीमध्ये खूप तीव्र वेदनांना सामोरं जावं लागतं. अशावेळी काही घरगुती उपायांनी सुद्धा तुम्ही वेदनेवर मात करु शकाल. मासिक पाळीची अनियमितता, मासिक पाळीतील वेदना आणि अगदी हार्मोन्स देखील आपण संतुलित करू शकतो. म्हणून तुम्हीही तुमच्या आहारात या चहाचा समावेश करायला सुरुवात करा, अवघ्या महिन्याभरात खूप चांगला फरक दिसून येईल.

 

मासिक पाळी सुखकर जाण्यासाठी चहा कसा कराल?

धणे चहा बनवण्यासाठी, एक चमचा धणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी एका पॅनमध्ये धणे आणि पाणी घालून चांगले उकळवा. ते अर्धे होईल तेव्हा ते गाळून घ्या. जेव्हा हा चहा थोडा कोमट असेल तेव्हा तो दररोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या. ज्या महिला किंवा मुलींची मासिक पाळी वेळेवर येत नाही त्या दिवसातून दोन ते तीन वेळा ही चहा पिऊ शकतात.

धण्याचा चहा पिण्याचे फायदे?

धणे इस्ट्रोजेन संप्रेरके संतुलित करण्यास मदत करतात. यामुळे मासिक पाळीशी संबंधित समस्या जसे की, मूड स्विंग, चिडचिड किंवा थकवा कमी व्हायला मदत होते.

 

धणे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. तसेच आतड्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा धणे फायदेशीर आहेत. यामुळे चयापचय देखील वाढते.

 

मासिक पाळी दरम्यान खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल तर धण्याचे पाणी पिण्यामुळे, रक्तस्त्राव नियंत्रित होण्यास मदत होते.

 

धण्यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म मासिक पाळीतील क्रॅम्प आणि वेदना कमी करण्यास देखील उपयुक्त आहेत.

 

धणे कसे खावे?
धणे खाण्यासाठी, धणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्यातून चहा बनवा, तो गाळून प्या. याशिवाय, तुम्ही धणे पाण्यात उकळून, मध आणि लिंबू घालून ते चहासारखे पिऊ शकता किंवा गरम पाण्यात धणे पावडर घालून ते सेवन करू शकता. फक्त लक्षात ठेवा धणे जास्त प्रमाणात सेवन करू नका, कारण त्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)