मस्कारा लावताना तुमचाही हात थरथरतो! आता काळजी करु नका, मस्कारा लावण्यासाठी या टिप्स वापरा

आपल्या सौंदर्यामध्ये डोळ्यांचे महत्त्व हे अबाधित आहे. म्हणूनच डोळ्यांचा मेकअप करणे हे कसोटीचं काम मानलं जातं. डोळ्यांच्या मेकअपमध्ये मस्कारा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. मस्कारा लावताना अनेकींचे हात थरथर करतात त्यामुळे मस्कारा पसरतो. मस्कारा पसरल्यावर पुन्हा डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग काळा होताे. त्यामुळे मस्कारा पसरण्यापेक्षा न लावलेलाच बरा असा विचार केला जातो. आता तुम्ही मस्कारा लावण्याची चिंता करु नका. आम्ही तुम्हाला सांगतोय मस्कारा लावण्यासंदर्भातील काही महत्त्वाच्या टिप्स. 

सर्वात प्रथम मस्कारा ब्रशची कांडीसारखी ट्यूबच्या आत बाहेर करू नका. त्यामुळे ट्यूबमध्ये हवा जाते आणि मस्कारा लवकर कोरडा होतो. थोडयाच दिवसांमध्ये तो कडक होतो. त्यासाठी हळुवार ब्रशची कांडी मागे-पुढे व गोलाकार फिरवून पाहिजे तेवढा मस्कारा ब्रशवर घ्यावा. 

टय़ूबमधून ब्रश काढताना जास्तीचा मस्करा काढून टाकावा जेणेकरून पापणीचे केस एकमेकांना चिकटणार नाहीत.

मस्कारा लावण्याची सुरुवात खालच्या किंवा वरच्या पापणीपासून केलीत तरी चालेल. पण जर खालच्या पापणीपासून केलीत तर वरच्या पापणीवर येणारे डॉट्स टाळू शकता. कारण खालच्या पापणीला मस्कारा लावण्यासाठी खाली बघितले की वरच्या पापणीचे केस खाली चिकटतात.

वरच्या पापणीला मस्कारा लावताना सरळ बघावे. ब्रश पापणीच्या टोकाशी धरुन वरच्या दिशेने गोलाकार फिरवावा. त्यामुळे पापण्यांना मस्कारा लागून पापण्या कडक होतील. हीच क्रिया तोपर्यंत करत राहा जोपर्यंत हव्या तशा पापण्या जाड दिसत नाहीत. मस्काराचे साधारण २-३ कोट्स द्यावेत.

जेव्हा खालच्या पापणीला मस्कारा लावाल तेव्हा मान थोडी पुढे करून लावा जेणेकरून गालांना मस्कारा लागणार नाही.

मस्कारा अप्लाय करताना चेहऱ्याच्या इतरत्र भागावरही लागण्याची शक्यता असते. बऱ्याच जणींना ही अडचण असते त्यासाठी ज्या भागावर चुकून मस्कारा लागतो त्या भागावर टिश्यू पेपर ठेवावा. मस्कारा जर पापण्यांच्या मुळापासून लावला नाही तर त्या आहेत त्यापेक्षा लहान दिसतात.