तुमच्यापैकी कितीजण बीएसएनएलचा फोन वापरतात; लोकसभेत बीएसएनएल–जिओवरून हंगामा; सरकारची नामुष्की

नरेंद्र मोदी सरकारने भारत संचार निगम लिमिटेडला चालना दिली असून, बीएसएनएलला सोन्याचे दिवस आले आहेत, अशी मारलेली लोणकढी थाप आज लोकसभेत सरकारच्या चांगलीच अंगलट आली. बीएसएनएलने प्रगती केली आहे आणि सगळे काही सुशेगात आहे तर मग सत्तारूढ पक्षाचे किती लोक बीएसएनएलचा फोन वापरत आहेत, असा सवाल शिवसेनेचे गटनेते, खासदार अरविंद सावंत यांनी करताच, दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया निरुत्तर झाले. संसदेची प्रणाली बीएसएनएलवरच आहे, असे सांगत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कशीबशी वेळ मारून नेली.

अरविंद सावंत यांच्या प्रश्नांनी सिंधिया गांगरले

बीएसएनएलचे 70 लाख ग्राहक वाढले. सुधारणा झाली आहे, असा सिंधिया यांचा दावा मोडीत काढत अरविंद सावंत यांनी, बीएसएनएलमध्ये एवढीच सुधारणा झाली आहे तर मग सत्तारूढ पक्षाचे किती लोक बीएसएनएलचा फोन वापरतात, अशी विचारणा केली. मुंबईत एमटीएनएलच्या कर्मचाऱयांनी एकत्रित केलेली करोडोंची रक्कम बीएसएनएलने वापरली. बीएसएनएल एवढी सशक्त आहे तर मग कर्मचाऱयांच्या सहकारी सोसायटय़ांचा पैसा का वापरता, अशी प्रश्नांची सरबत्ती सावंत यांनी केली. सावंत यांच्या या प्रश्नांनी सिंधिया चांगलेच गांगरून गेले.

बँकिंग क्षेत्राला सशक्त करा – शिवसेनेची मागणी

बँकिंग क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती देणारे महत्त्वाचे क्षेत्र आहे, मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक न करण्याची ग्राहकांची मानसिकता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जनताभिमुख निर्णय घेऊन बँकिंग क्षेत्राला सशक्त करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेने आज लोकसभेत केली. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी बँकिंग क्षेत्रातील सुधारणांसंदर्भातील दुरुस्ती विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना शिवसेनेची भूमिका मांडली. सहकारी बँका व इतर बँकिग क्षेत्रात विश्वासाचे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. बँकेशिवाय इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे. बँक अडचणीत आली की ब्लॅक आऊटचा पर्याय अवलंबला जातो, मात्र बँक लवकरात लवकर कशी उभी करता येईल यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. बँकेबद्दलचा सर्वसामान्यांच्या मनातला विश्वास वाढायला हवा तरच बँकिंग क्षेत्र अधिक मजबूत होईल, असेही खासदार देसाई यांनी यावेळी नमूद केले.