गेल्या दोन आठवड्यांपासून महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या नावावरून गोधळ पाहायला मिळत आहे. यातच भाजपने देवेंद्र फडणवीस यांची आज गटनेतेपदी निवड केली आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर आज महायुतीच्या नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा वादा केला. ही संपूर्ण घडामोडी दुपारी चारच्या सुमारास घडली. मात्र याआधीच मुख्यमंत्री शपथविधीची अधिकृत निमंत्रणपत्रिका समोर आली. याच्यावरून आता काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले आहेत की, राज्यपाल रमेश बैस यांनी महायुतीला सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्याआधीच अशाप्रकारे निमंत्रणपत्रिका कशी प्रकाशित करण्यात आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. भाजप हा संविधानाला न मानणार पक्ष असल्याचंही ते म्हणाले आहेत.
लोंढे म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेबरला जाहीर झाले. बहुमत असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलं नाही. राज्यात 11 दिवस कोणतेही सरकार नव्हते. मात्र तरीही राज्यात राष्ट्रपती शासन लावण्यात आले नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर गुरूवारी सायंकाळी 5.30 वाजता महायुतीचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.