Nanded News – कौठा येथील घरकुल अनुदान वाटप घोटाळा, तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कौठा येथील घरकुल अनुदान वाटप घोटाळा प्रकरणात आरोपी असलेल्या दोन तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज बिलोली येथील न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

कौठा ग्रामपंचायत अंतर्गत अपात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत पात्र दाखवून शासनाकडून आलेल्या घरकुल अनुदान वाटपात 14 लाख 40 हजार रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात दि.5 एप्रिल रोजी दोन गट विकास अधिकाऱ्यांसह 20 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणातील 20 आरोपींपैकी तत्कालीन गटविकास अधिकारी तथा सध्याचे नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार व तत्कालीन गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी दि.8 एप्रिल रोजी बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणाची सुनावणी दि.17 एप्रिल रोजी न्यायाधीश व्हि.बी.बोहरा यांच्यासमोर झाली असून दोन्हीही आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. फिर्यादीच्या बाजूने अँड.ए.बी. शाहरुख, शासकीय वकील एम एस.बी. कुंडलवाडीकर तर अर्जदाराकडून एन.एच.येरावार यांनी न्यायालयात बाजू मांडली.