
काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानी सैन्य अॅक्शन मोडवर आलं आहे. सुरक्षा दलांनी पुलवामा, शोपियान आणि कुलगाममध्ये दहशतवाद्यांची पाच घरे उद्ध्वस्त केली आहेत. दहशतवाद्यांवर सतत कारवाई केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमध्ये लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय दहशतवादी कमांडर शाहिद अहमद कुटे याचे घर सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केले. शाहिद गेल्या तीन ते चार वर्षांपासून सक्रिय आहे आणि अनेक देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता. शुक्रवारी रात्री सुरक्षा दलांनी कुलगाममधील क्विमोह येथील दहशतवादी झाकीर घनीचे घरही उद्ध्वस्त केले. पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत सुरक्षा दलांनी एकूण पाच दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.
तसेच शुक्रवारी पुलवामामध्ये हिंदुस्थानी सैन्याने आणखी एका दहशतवाद्याचे घर उद्ध्वस्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी एहसान उल हकचे घर जमीनदोस्त करण्यात आले. याआधी सुरक्षा दलांनी आणखी दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली. ज्यामध्ये अनंतनाग जिल्ह्यातील गोरी भागात एका दहशतवाद्याचे घर बॉम्बने उडवून देण्यात आले, तर दुसऱ्या संशयिताचे घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आले.