सरत्या वर्षाला बायबाय करतानाच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी रायगडातील निसर्गरम्य किनारे गाठण्याचे बेत आखले आहेत. यासाठी गेल्या आठवड्यापासूनच हॉटेल, होम स्टे तसेच खासगी बंगल्यांचे बुकिंग करण्यास सुरुवात केली असून दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे दहा दिवस आधीच रायगडातील हॉटेल, रिसॉर्टचे बुकिंग फुल्ल झाले आहे. यामुळे व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. दरम्यान, 25 डिसेंबर नाताळपासूनच 31 डिसेंबरपर्यंत पर्यटकांची ओव्हरपॅक गर्दी होणार असल्याने अलिबाग, मुरुड, उरणमधील किनाऱ्यांवर पोलिसांनी वॉच ठेवण्यासाठी पथके तयार आहेत.
मुंबई, ठाणे तसेच पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने पर्यटक रायगडातील समुद्रकिनाऱ्यांना पहिली पसंती देतात. त्यामुळे दरवर्षी दिवाळी, उन्हाळी सुट्टया, नाताळ, थर्टीफर्स्टला मुरुड, अलिबाग, काशिद, श्रीवर्धन तसेच उरणमधील किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होते. यावर्षीदेखील दहा दिवस अगोदरच हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टेसाठी आगाऊ बुकिंग करण्यात आल्याने सर्वच ठिकाणी हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला आहे. एरवी हजार, बाराशेपासून असणारे रूम भाडे आता थेट दोन हजारांपासून दहा हजारांवर गेले असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
– थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगडातील सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये विद्युत रोषणाईचा सध्या झगमगाट दिसून येत आहे.
– जिल्ह्यात सुमारे तीन लाख पर्यटक दाखल होतील असा अंदाज असून हॉटेल, कॉटेज, लॉजव्यतिरिक्त इतर व्यवसाय तेजीत येणार आहेत.
– न्यू इअर सेलिब्रेशनसाठी रायगडातील हॉटेल तसेच रिसॉर्टमध्ये ऑर्केस्ट्रा, डिजे नाईट, डान्सचे आयोजन केले आहे.
नाताळ व स्वागतासाठी पर्यटकांनी आगाऊ चाळ व नववर्ष स्वागताला त्यामुळे कॉटेज फुल झाले आहे. सध्या कॉटेजची सजावट करण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करीत आहोत. तसेच पर्यटकांना येथील खाद्यसंस्कृतीचा परिचय देण्यासाठी केवळ रायगडचे खाद्यपदार्थ ठेवण्यात येणार आहेत.
■ प्रभाकर पाटील, कॉटेज मालक.