एसटी प्रवाशांना चांगली सुविधा न देणारे हॉटेल थांबे रद्द

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना चांगली सुविधा दिली जात नसेल तर ते थांबे रद्द केले जाणार आहेत. प्रवाशांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व थांब्यांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल 15 दिवसांत सादर करा आणि अस्वच्छ थांबे रद्द करा, असे निर्देश एसटी प्रशासनाला देण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस राज्यभरातील विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा-नाश्ता अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी येतात. परिसरात अस्वच्छता असण्याबरोबरच प्रवाशांना शिळे अन्न दिले जाते आणि जास्त पैसे आकारले जातात. तसेच हॉटेल कर्मचारी व मालकांची वर्तणूक योग्य नसते. या पार्श्वभूमीवर सर्व हॉटेल-मोटेल थांब्यांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करा, जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करून नव्या थांब्यांना मंजुरी द्या, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत.