
न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळाप्रकरणी आणखी एकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. राजीव रंजन रमेशचंद्र पांडे ऊर्फ पवन गुप्ता असे त्याचे नाव आहे. तो झारखंडचा हॉटेल व्यावसायिक आहे. त्याला हितेश मेहता आणि उल्हानाथन मारुतुवारने पंधरा कोटी रुपये मार्केटमध्ये लावण्यासाठी दिले होते. त्याच्या अटकेने अटक आरोपींची संख्या आठ झाली आहे.
न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली होती. हितेश मेहता, धर्मेश पौन, अभिमन्यू भोन आणि मनोहर मारुतवर हे चौघे न्यायालयीन कोठडीत आहेत, तर कपिल ढेढिया, जावेद आलम, उल्हानाथन मारुतुवार हे पोलीस कोठडीत आहेत. त्या चौघांच्या चौकशीत पांडेचे नाव समोर आले. पांडे हा झारखंडचा रहिवासी आहे. त्याला हितेश आणि उल्हानाथनने घोटाळ्यातील रक्कम मार्केटमध्ये लावण्यासाठी दिली होती.
सीएसआर फंड उपलब्ध असलेल्या कंपनीला देऊन रोख रकमेच्या बदल्यात सुमारे 50 टक्के जास्त रक्कम त्यांना तो मिळवून देणार होता. त्याने पांडेला 15 कोटी रुपये दिले होते. तो लाभार्थी असल्याने पोलीस त्याचा शोध होत होते. तपासादरम्यान पोलिसांना त्याची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक झारखंड येथे गेले. तेथून त्याला ताब्यात घेतले होते. तेव्हा त्याने पोलिसांना पाहून आरडाओरड करून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून मुंबईत आणले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्याला हितेश आणि उल्हानाथनकडून 15 कोटी रुपये मिळाल्याचे पोलिसांना सांगितले. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.