नववर्षाच्या स्वागतासाठी कोणी धार्मिक, आध्यात्मिक ठिकाणी मनःशांतीसाठी कुटुंबासह जातात तर काही जण मद्य सेवन करून स्वागत करतात. मात्र, पिनेवालों को पिने का बहाना चाहीए म्हणत दारूचे पेग ढोसणाऱ्यांमुळे भांडणे, मारहाणी तसेच अपघात घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीला केवळ चार पेग देण्याचा निर्णय हॉटेल असोसिएशनने घेतला आहे.
नववर्षाची चाहूल लागली की, मद्यप्रेमी घरात किंवा हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जाऊन काय खायचे आणि प्यायचे याचा प्लॅन करत असतात. त्यातून आपले आवडते मद्य पिण्यासाठी मित्रांच्या गराड्यात हॉटेलमध्ये जाण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. त्यात आता 31 डिसेंबरच्या रात्री पहाटे 5 पर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पिणाऱ्यांचा धिंगाणा रात्रभर सुरू राहणार आहे.
सुखरूप घरी पोहोचावे, हाच उद्देश
काही ठिकाणी अति मद्यपान केल्यानंतर झोकांडी देणाऱ्या किंवा शुद्ध नसलेल्या ग्राहकांना सुखरूप घरी पोहोचवण्यासाठी भाड्याने ड्रायव्हर देण्याची योजनादेखील हॉटेल असोसिएशनने केली आहे.
ग्राहकांची सुरक्षा महत्त्वाची
नववर्ष साजरे करताना घेतलेल्या या निर्णयाबाबत सर्व सदस्यांना कळवण्यात आले आहे. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्व निर्णय घेण्यात आले आहेत. ग्राहकांना चार पेग प्यायल्यानंतर झिंग आल्यास त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉटेल मालकांना करण्यात आल्या आहेत, असे हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे सचिव प्रदीप शेट्टी यांनी सांगितले.