वसतिगृहाच्या छतावर आंघोळीसाठी चाललेल्या विद्यार्थ्याला वॉर्डनने ढकलले, मुलाचा मृत्यू; दोन शिक्षकांना अटक

वसतिगृहाच्या छतावर अंघोळीसाठी चाललेल्या सातवीच्या विद्यार्थ्याला वॉर्डनने छतावरून खाली फेकल्याची भयंकर घटना राजस्थानमध्ये घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी वॉर्डनसह दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

करौलीमधील सलेमपूर गावातील सरस्वती विद्या मंदिर या खासगी निवासी शाळेत ही घटना घडली. सातवी इयत्तेत शिकणारा दिलराज मीना हा मुलगा 13 डिसेंबर रोजी अंघोळीसाठी वसतिगृहाच्या छतावर जात होता. यादरम्यान वॉर्डनने त्याला पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिले.

शाळा प्रशासनाने मुलाच्या घरच्यांपासून ही माहिती लपवली. अखेर तीन दिवसांनी मुलाने कुणाच्या तरी मोबाईलवरून ही माहिती आपल्या घरच्यांना दिली. यानंतर कुटुंबीयांनी वसतिगृहात धाव घेत मुलाला गंगापूर शहरातील खासगी रुग्णालयात नेले. मात्र मुलाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला 18 डिसेंबर रोजी करौलीच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या मुलाला 21 डिसेंबर रोजी जयपूरला रेफर करण्यात आले. मात्र जयपूरला नेत असताना वाटेतच मुलाचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव जिल्हा रुग्णालयाच्या शवागाराबाहेर निदर्शने केली. शिक्षकाला अटक करण्याची आणि शाळा सील करण्याची मागणी कुटुंबीयांनी यावेळी केली. यानंत पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केले. याप्रकरणी दोन आरोपी शिक्षकांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या मागणीवरून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.