गोंदियात शिवशाही बसला अपघात, 11 ठार, 29 जखमी

गोंदिया जिह्यात शिवशाही बसच्या भीषण अपघातात 11 प्रवासी ठार झाले तर 29 जण जखमी झाले. यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भंडाऱ्याहून गोंदियाकडे जात असताना बसचा अपघात झाला. संपूर्ण बस उलटली. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळी आसपासच्या गावांतील गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि उलटलेली बस उभी करून बसमधून मृतदेह बाहेर काढले. अर्जुनी तालुक्यातील खजरी आणि डव्वा गावाजवळ हा अपघात झाला. अपघात इतका भयंकर होता की, बस रस्त्याच्या कडेला अक्षरशः पलटी झाली. बस वेगात असल्यामुळे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. वेगामुळे बसमधील अनेकांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न

अर्जुनी तालुक्यातील खजरी आणि डव्वा गावाजवळ बस आली असता दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि बस उलटली. बस भरधाव असल्याने आणि अचानक दुचाकीस्वार समोर आल्याने बसचालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले. बसचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेनंतर घाबरलेल्या बसचालकाने पळ काढला. त्याचा शोध सुरू आहे.