
आधार लिंक आणि मोबाईल नंबर पडताळणी व्हावी. जिल्ह्यातील 657 वृद्ध कलाकारांचे मानधन गेल्या सहा महिन्यांपासून लटकले आहे. सध्या जिल्ह्यात 1498 वृद्ध कलाकारांना मानधन मिळत असून, त्यांतील 841 जणांची ‘आधार’ जोडणी झालेली आहे.
पुणे जिल्ह्यातून नव्याने 532 वृद्ध कलाकारांचे अर्ज मानधन योजनेसाठी आलेले आहेत. यामध्ये भक्ती संप्रदायाशी संबंधित गायक तमाशा क्षेत्रातील 55, जागरण गोंधळ क्षेत्रातील 14 आणि इतर लोककलावंत यांचे 71 अर्ज असून, या अर्जावर शासनाच्या सुधारित आदेशाप्रमाणे मंजुरीची कार्यवाही केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली कलाकार मानधन योजनेसंदर्भात बैठक झाली. जिल्ह्यात सद्यःस्थितीत 1498 वृद्ध कलाकारांना मानधन योजना लागू आहे. या कलाकारांमधील 657 कलाकारांची आधार जोडणी झालेली नाही अथवा त्यांची मोबाईल नंबर पडताळणी झाली नसल्यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे सहा महिन्यांपासून त्यांचे मानधन देण्यात आलेले नाही. हे वृद्ध कलाकार आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे आधार कार्ड मोबाईलला लिंक करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.
यासंदर्भात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे म्हणाले, ‘ज्या वृद्ध कलाकारांचे आधार लिंक झालेले नाही, त्यांचा शोध घेण्यासंदर्भात ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक कलाकारांचे पत्ते चुकीचे आढळून येत असल्याने त्यांच्या नव्या पत्त्याची माहिती मिळवून संपर्क केला जात आहे.’
कलाकारांचा कोटा निश्चित
शासनाच्या नव्या निर्देशांप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेल्या वृद्ध कलाकारांच्या मानधन योजनेतील एकूण अजर्जापैकी भक्त संप्रदायाशी संबंधित कलाकार 10 टक्के, संघटित असंघटित कलाकार ६ टक्के आणि लोप पावत चाललेल्या कला साहित्यिक प्रयोगशील कलाकारांना 30 टक्के याप्रमाणे कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या अर्जावर निवड करताना हे निकष पाळले जाणार आहेत. सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यासाठी वृद्ध कलाकार अर्ज मंजुरीचा वार्षिक कोटा 100 कलाकार याप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे.