जळगावात सैराट! प्रेमविवाह करणाऱ्या मुलीला बापाने ठार मारले, गोळीबारात जावई गंभीर जखमी

विज्ञानयुगातही जातीपातीच्या भिंती मजबूत होत असल्याचा गंभीर विषय सैराट चित्रपटाने मांडला होता. त्या चित्रपटाचा शेवट आठवणारा थरार आज चोपडय़ातील आंबेडकरनगरात घडला. दोन वर्षांपूर्वी मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱयाने हळदीच्या कार्यक्रमात पोटच्या मुलीसह जावयावर गोळीबार केला. यात मुलगी जागीच ठार, तर जावई गंभीर जखमी झाला. तृप्ती अविनाश वाघ (24) असे गोळीबारात ठार झालेल्या मुलीचे नाव असून, तिचा पती अविनाश ईश्वर वाघ (28) गंभीर जखमी झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी अविनाश व तृप्ती यांचा प्रेमविवाह झाला होता. हा विवाह तृप्तीच्या वडिलांना मान्य नव्हता. त्यातच शनिवार, 26 रोजी अविनाशच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम चोपडा शहरातील खाईवाडाजवळील आंबेडकरनगर येथे होता. त्यानिमित्ताने ते दोघेजण पुण्याहून चोपडय़ात आले होते.

हळदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मंडपात जमलेले पाहुणे डीजे लावून नाचत असताना तृप्तीने प्रेमविवाह केल्याचा राग असलेले वडील सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी किरण अर्जुन मंगले व मुलगा निखिल मंगले हे दोघे जण मंडपात आले. वऱहाडी नाचण्यात दंग असतानाच किरण मंगले याने पिस्टल काढून मुलगी तृप्ती वाघ व तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. यात मुलगी तृप्ती जागीच ठार झाली, तर जावई अविनाशच्या पाठीतून गोळी पोटात घुसली व दुसरी गोळी हाताला लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला अत्यवस्थ अवस्थेत जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, हळदीच्या कार्यक्रमात गोळीबार केल्याने संतापलेल्या वऱहाडींनी गोळीबार करणाऱया किरण मंगलेला चांगलेच बुकलून काढले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.

या प्रकरणी अविनाश वाघ याची आई प्रियंका ईश्वर वाघ (रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे) यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी किरण अर्जुन मंगले व निखिल किरण मंगले या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे करीत आहेत.