निवडणूक कामासाठी वापरलेल्या वैजापूर – कोपरगाव एसटीच्या सीटखाली पाचशे रुपयांची दोन बंडले मिळून एकूण रक्कम 86 हजार 500 रुपये आढळून आले. बसमधून प्रवास करीत असलेल्या संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे सदरची रक्कम बसच्या वाहकाकडे जमा केल्याने त्याचे कौतुक होत आहे, तर बुधवारी मतपेटय़ा जमा केल्यानंतर गुरुवारी (दि. 21) सायंकाळी त्याच बसमध्ये एवढी मोठी रक्कम सापडल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
कोपरगाव आगाराची बस (क्र. एमएच 40 वाय 5679) ही बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी स्ट्राँग रूमपासून एव्हीएम आणि कर्मचाऱयांना घेऊन गेली होती. गुरुवारी नेहमीप्रमाणे ही एसटी वैजापूर – कोपरगाव अशा फेऱया मारत असताना त्या बसमधून संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल येथून काही विद्यार्थी धामोरीला जात होते. या विद्यार्थ्यांना बसच्या शेवटच्या सीटखाली 500 रुपयांची दोन बंडले सापडली, ती एकूण रक्कम 86 हजार 500 रुपयांची होती. हे साईराज कदम या विद्यार्थ्याच्या लक्षात आले. त्याने ही सापडलेली रक्कम संजीवनी इंग्लिश मीडियमचे कर्मचारी रोहित होन व सचिन भालके यांच्याकडे रक्कम सुपूर्द केली. त्यानंतर हे नोटांचे बंडल वाहक सविता मनोज अडांगळे यांच्याकडे जमा करण्यात आले. आगार प्रमुख अमोल बनकर यांनी सदरची रक्कम ताब्यात घेतली आहे.
विद्यार्थी आणि वाहकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र सदर रक्कम कोणाची याचे गूढ वाढले असून कोपरगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात कुठलाही गुन्हा नोंदविलेला नाही.