तेलकट त्वचेला आता करा बाय बाय, वाचा ‘हे’ साधे सोपे घरगुती उपाय

सुंदर चेहरा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. पण या सुंदर चेहऱ्यातील अडसर म्हणजे तेलकट त्वचा. तेलकट त्वचेच्या लोकांना अधिक व्हाइटहेडस्च्या समस्येचा सामना करावा लागतो. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरमांचे प्रमाण वाढते. हे मुरुम मोठे झाल्यावर, चेहरा अधिक विद्रुप दिसू लागतो. म्हणूनच तेलकट त्वचा असणाऱ्यांना त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. योग्य निगा राखल्यास तेलकट त्वचा सुद्धा चांगली कोमल मुलायम त्वचा होऊ शकते.

चेहऱ्यावर तेलकटपणामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स वाढतात. त्यामुळेही चेहरा खराब दिसू लागतो. अशावेळी मूळ कारणांवर उपाय करणे गरजेचे आहे. यातील मूळ कारण आहे त्वचेचा तेलकटपणा. त्वचेच्या तेलकटपणावर आपण घरगुती उपायांचा अवलंब करु शकतो.

बेकिंग सोडा आणि पाणी – एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हळूवारपणे मालिश करा. किमान 5-10 मिनिटे हे मिश्रण तसेच राहू द्यावे. नंतर पाण्याने तोंड धुवा. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा याची पुनरावृत्ती करा.

लिंबाचा रस आणि दालचिनी पावडर – एका भांड्यात दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा दालचिनी पावडर घ्या. त्याची चांगली पेस्ट बनवा. काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मालिश करा. 15-20 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा.

स्ट्रॉबेरी आणि तांदळाचे पीठ – 1 किंवा 2 ताज्या स्ट्रॉबेरी घ्याव्यात लहान तुकडे करून नीट मॅश करावे. त्यात एक चमचा तांदळाचे पीठ घालून मिक्स करावे. त्यानंतर चेहरा व मान या भागांवर हे मिश्रण लावावे. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मालिश करा. मिश्रण त्वचेवर 5-8 मिनिटे ठेवा. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा.

(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)