शिंदेंना गृह खातं नाहीच! मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं मोठं विधान

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असले तरी खातेवाटपावरून तीन पक्षांमध्ये अजूनही गोंधळ पाहायला मिळत आहे. गृह आणि महसूल, यासारखी मलईदार खाते मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याचं बोललं जात आहे. याचबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. ”गृह विभाग आमच्याकडे असावा, असं आमचं मत आहे”, असं म्हणत फडणवीस यांनी शिंदे यांची कोंडी केली आहे. तसेच या विधानातून भाजप गृहखातं सोडणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

एकनाथ शिंदे हे गृहखात्याची मागणी करत आहे. हे खातं तुम्ही सोडणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ”गृह विभाग आमच्याकडे असावा, असं आमचं मत आहे. मागील काही वर्षांत हे खातं आमच्याकडे राहिलेलं आहे आणि गृह विभागाला केंद्रीय गृह मंत्रालयाशीही सतत समन्वय साधावा लागत असतो. कारण राज्यात नक्षलवादाची समस्या आहे, मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे.”

ते पुढे म्हणाले, ”एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील केंद्राशी समन्वय साधू शकतात. कारण ते आमचे मित्रपक्षच आहेत. मात्र मी भाजपचा असल्यामुळे केंद्राशी समन्वय साधणं अधिक सोपं जातं. त्यामुळे हे खातं भाजपकडे राहावं, असा आमचा प्रयत्न असतो.”, असं विधान फडणवीस यांनी केलं आहे.