हॉलीवूड अभिनेत्री डेल हेडनचा (76) अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील तिच्या घरी मृत्यू झाला. अभिनेत्री तिच्या बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ माजली. कार्बन मोनोऑक्साइड वायूमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. गॅस हिटिंग सिस्टममध्ये गडबड झाल्यामुळे कार्बन मोनोऑक्साइडची गळती झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा वायू मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे तेथील दोन डॉक्टर आणि एक पोलीस अधिकारी बेशुद्ध झाले.
1970 आणि 1980 चे दशक गाजवणारी हेडन एकेकाळी मोठमोठ्या मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकत असे. हेडन ही सामाजिक कार्यकर्ती आणि मॉडेल अशा भूमिकांमध्ये दिसली. मुलीला जन्म दिल्यानंतर तिने काही काळ मॉडेलिंग क्षेत्र सोडले होते, पण 1991 मध्ये पतीच्या निधनानंतर तिने पुन्हा या क्षेत्रात पुनरागमन करायचे ठरवले. मात्र इच्छा असतानाही या वेळी तिला मॉडेलिंग क्षेत्रात काम करता आले नाही. वयाच्या 38 व्या वर्षी मॉडेलिंगसाठी तू सक्षम नसल्याचे तिला सांगण्यात आले. पुढे तिने जाहिरात क्षेत्रात नशीब आजमावले.