होळकर छत्री मंदिरास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या; इंदूरच्या क्षत्रिय धनगर सेवा संघाच्या कार्यकर्त्यांची मंदिरास भेट

मंदिर संस्कृतीची उत्कृष्ट निर्मिती व जिर्णोद्धार करणारे आणि इतिहासात आपल्या महापराक्रमाचा ठसा उमटवणारे, खंडोबा भक्त सरदार मल्हारराव होळकर यांच्या जेजुरी येथील मल्हार गौतमेश्वर स्मृती छत्री मंदिराला राष्ट्रीय इंदूरच्या क्षत्रिय धनगर सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी या प्राचीन छत्री मंदिरास संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या पुण्यस्मरण शताब्दी सोहळ्या निमित्ताने मध्य प्रदेश, इंदूर व महेश्वर येथून आलेल्या क्षत्रिय धनगर सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी जेजुरीच्या मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिरास नुकतीच भेट दिली. प्राचीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले होळकरांचे छत्री मंदिर व त्या समोरील नंदी, हा आपला मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे, याचे रक्षण झाले पाहिजे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. पिवळ्याधमक भंडाऱ्याची उधळून करीत, या ऐतिहासिक वास्तूला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा शासनाने द्यावा, अशी मागणी केली.

इंदूर येथील धनगर समाज सेवा संघाचे कार्यकर्ते संजय कड, दीपक वालेकर, पांडुरंग होळकर, अशोक काळे, मयंक भुसारी, मधुकर गोरे, सुबोध तांबे, विकास पारधी, शरद पारखे, बारामतीचे विक्रांत काळे, पुण्याचे विठ्ठल कडू यांनी ही मागणी केली आहे. याप्रसंगी श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. इंदूरच्या क्षत्रिय धनगर संघाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा 300 व पुण्यस्मरण शताब्दी सोहळा होत आहे. त्यानिमित्ताने दिनांक 6 ते 7 मे पर्यंत मध्य प्रदेशातील इंदूर ते महाराष्ट्रातील चौंडीपर्यंत कर्मभूमी ते जन्मभूमी अशी भव्य ‘अहिल्या विचार यात्रा’, परिक्रमा होणार असल्याचे दीपक वालकर यांनी सांगितले.