जिल्ह्यात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केली होती. आता दोन दिवस पावसाचा जोर कमी असला तरी अनेक मार्ग अजूनही पाण्याखाली असून, बंद आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या सोमवार दि.29 जुलै रोजी करवीर उपविभागीय अधिकाऱ्यांनी करवीर तालुक्यातील शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. रात्री उशिरा याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आदेश काढण्यात आला आहे.
तसेच शिरोळ तालुक्यात 9 शाळांमध्ये पूरबाधीत नागरीकांसाठी निवारा केंद्र तयार करण्यात आल्यामुळे या 9 शाळा बंद ठेवण्याबाबत तेथील तहसीलदार यांनीही विनंती केली होती.शिरोळ तालुक्यातील दत्त कनिष्ठ महाविद्यालय,तेरवाड आश्रमशाळा एस.पी. हायस्कूल,एस.के.पाटील महाविद्यालय,चंद्रकला बालक मंदिर,सैनिकी पॅटर्न शाळा, सर्व कुरुंदवाड, कुमार विद्या मंदिर, जि.प.शाळा अकिवाट, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, तेरवाड आणि जिल्हा परिषद विद्यामंदिर, धरणगुत्ती या 9 शाळांचा समावेश आहे.
त्यामुळे अमोल येडगे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर, यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील अधिकारान्वये जिल्हयातील करवीर तालुक्यामधील कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासह सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेमधील सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिरोळ तालुक्यातील संबंधित 9 शाळांना दि.29 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.