
संपूर्ण देशात होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, आपल्या घरापासून लांब राहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कुंटुंबियांसोबत सणउत्सव साजरा करायची इच्छा असते. त्यामुळे सणाच्या दिवशी लोकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी एअर इंडियाने नवीन ऑफर लॉन्च केली आहे. यामुळे प्रवाशांना कमी खर्चात आणि योग्य सोईसुविधांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे.
होळीनिमित्त अनेक विमान कंपन्यांनी सवलतीच्या ऑफर जाहीर केल्या आहेत. अशातच एअर इंडियानेही प्रवाशांच्या सोयीसाठी मोठी घोषणा केली आहे. एअर इंडियाच्या विमानातील प्रीमियम इकॉनॉमी क्लासचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये देशांतर्गत प्रवासी फक्त 599 रुपये अतिरिक्त खर्च करून स्टँडर्ड इकॉनॉमीवरून प्रीमियम इकॉनॉमी क्लासमध्ये आपली सीट बुक करू शकतात. ही ऑफर फक्त ठराविक देशांसाठीच मर्यादित ठेवण्यात आली आहे.
एअर इंडिया सध्या 39 देशांतर्गत मार्गांवर दर आठवड्याला 50 हजाराहून अधिक प्रीमियम इकॉनॉमी सीट्स देते. यामध्ये दिल्ली-मुंबई, दिल्ली-बंगळुरू, दिल्ली-हैदराबाद, मुंबई-बंगळुरू आणि मुंबई-हैदराबाद या मार्गिकांचा समावेश आहे. या मार्गाने जाणाऱ्या विमानांमध्ये किमान 34 हजार जागा उपलब्ध असतात. सणासुदिच्या दिवसांमधील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता एअर इंडियाने त्यांच्या प्रीमियम इकॉनॉमीच्या सीट्स 30 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दर आठवड्याला 65 हजारांहून अधिक जागा उपलब्ध होतील.