होळीनिमित्ताने रेल्वे गाड्यांना गर्दी; सीएसएमटी, दादर, ठाण्यासह सहा स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट बंद

होळी सणानिमित्त कोकणासह पुणे, सोलापूर, अक्कलकोट, नागपूर तसेच उत्तर प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांना गर्दी होऊ लागली आहे. दरवर्षी होळीच्या काळात मुंबई-ठाण्यातील वर्दळीच्या स्थानकांत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी सीएसएमटी, दादर, ठाण्यासह सहा प्रमुख स्थानकांत 16 मार्चपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे.

होळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वर्षागणिक वाढतीच आहे. प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन मध्य रेल्वेने यंदा विविध मार्गांवर अतिरिक्त गाडय़ा सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष गाडय़ा व नियमित गाडय़ांमुळे रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. अशा स्थितीत प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) तसेच ठाणे, कल्याण व पनवेल या प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री 16 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. केवळ वृद्ध प्रवासी तसेच वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या प्रवाशांच्या बाबतीत हे निर्बंध शिथिल केले आहेत. वृद्ध आणि आजारी प्रवाशांना मदत करण्यासाठी सोबतच्या व्यक्तीला प्लॅटफॉर्म तिकीट दिले जाईल, असे मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्लॅटफॉर्मवर रांगांची शिस्त लावणार

सीएसएमटी, दादरसारख्या स्थानकांत लांब पल्ल्याच्या गाडय़ांना मोठी गर्दी होते. गर्दीत अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्लॅटफॉर्मवर ‘कन्फर्म तिकीट’ असलेल्या प्रवाशांच्या रांगांचे नियोजन केले जाणार आहे. प्रवाशांना रांगांची शिस्त लावण्यासाठी रेल्वे पोलीस ‘दंडुका’ उगारणार आहेत.

सीएसएमटी, एलटीटी स्थानकांवर होल्डिंग एरिया

सीएसएमटी, एलटीटी स्थानकांवर होल्डिंग एरिया उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर इतर गर्दीच्या स्थानकांवरही होल्डिंग एरिया उभारता येईल याची चाचपणी सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली.