
>> योगेश जोशी
चांगल्यावर वाईटाचा विजय आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून होळी हा सण साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तसेच याला हुताशनी पौर्णिमा असंही म्हणतात. उत्तर हिंदुस्थानात फाल्गुन पोर्णिमा हा वर्षातील शेवटचा दिवस असतो. त्यामुळे होळीनंतर त्यांचा चैत्र महिना आणि नवे वर्षही सुरू होते. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानात या सणाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सण-उत्सवांप्रमाणे होळीलाही अनेक कथा आहेत. तसेच यामागे वैज्ञानिक कारणही आहे.
शिशिर ऋतू गारवा असतो आणि या ऋतूत मोठ्या प्रमाणात पानगळही झालेली असते. या सुकलेल्या आणि गळालेल्या पानांचा आणि सुकलेल्या झाडाच्या फाद्या होलिका दहनासाठी वापरतात. तसेच गारवा असणारा शिशिर ऋतू आणि पानगळीचा हंगाम संपून निर्सगात नवी पालवी दिसू लागते अशी चैत्रपालवीची चाहूल देणारा सण म्हणूनही होळीकडे बघितले जाते.
हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद विष्णूभक्त होता. हिरण्यकश्यपूला अमरत्वाचे वरदान मिळालेले असल्याने आता आपण च देव आहोत, अशा विचाराने तो मनमानी करत असतो. तसेच आता पृथ्वीवरील जनतेने विष्णू किंवा इतर देवतांची पूजा करू नये, आपलीच पूजा करावी, यासाठी तो सर्वत्र दहशत पसरवतो. आपल्याशिवाय अन्य कोणाही देवाचे पूजन, प्रार्थना करायच्या नाहीत अशी दवंडी तो पिटवतो. मात्र, त्याचा मुलगा प्रल्हाद सतत विष्णुभक्तीत रमलेला असतो. त्यामुळे त्याच्या रागाचा पारा चढतो. मुलाला अनेकदा समजावून आणि त्याचा छळ करूनही तो हिरण्यकश्यपूला देव मानण्यास नकार देतो आणि विष्णूचे नामस्मरण सुरूच ठेवतो. आता याला धडा शिकवायचा असे हिरण्यकश्यपू ठरवतो. आपल्याला दोव न मानणारा आपला मुलगा असला तरी त्याला आता ठार करायचे, असे तो ठरवतो.
या कामसाठी तो त्याची बहीण होलिकाला बोलावतो. होलिकेला कधीही अग्नीने जाळू शकत नाही, असे वरदान तिला मिळालेले असते. त्यामुळे होलिकेने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत प्रवेश करावा, असे तो तिला सांगतो. भावाच्या इच्छेप्रमाणे होलिका प्रल्हादला मांडीवर घेते, आणि बाजूला अग्नी पेटवण्याचा आदेश देते. मात्र, या आगीत कधीही अग्नी जाळणार नाही, असा वर मिळालेल्या होलिका जळून भस्म होते आणि प्रल्हाद सुखरुप अग्नीतून बाहेर येतो. त्यामुळे होलिकासारख्या दुष्ट प्रवृतींचे दहन आणि प्रल्हादासारख्या सात्विक वृत्तीचा विजय म्हणून होलिका दहनाची प्रथा सुरू झाल्याची कथा सांगण्यात येते.
उत्तर प्रदेशात कृष्ण आणि बलरामाच्या मंदिरात होळीनिमित्त रास खेळली जाते. तसेच लाठमारीचा खेळ खेळला जातो. लोकगीते गायली जातात. रंग उधळले जातात. देवळात विशेष पूजा केली जाते. होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जातो. हा सण राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करण्याचे प्रतीक आहे. श्रीकृष्ण आणि राधा यांनी सामायिक केलेल्या स्वर्गीय प्रेमाचा उत्सव आहे. याबाबतही एक कथा सांगितली जाते.
हिंदू पौराणिक कथांनुसार राधा अत्यंत गोरी होती आणि भगवान श्रीकृष्णाचा रंग सावळा होता. त्यामुळे कृष्णाने याबाबत आई यशोदाकडे तक्रार केली. यशोदा गंमतीत त्याला म्हणाली राधाला तू सावळा रंग लाव म्हणजे तीही तुझ्यासारखीच होईल. कृष्णाने आईच्या सल्ल्याप्रमाणे केले आणि राधाच्या चेहऱ्यावर ररंग लावत तिला सावळे करण्यासाठी गुलालाचा वापर केला आणि अशा प्रकारे होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली, असे सांगण्यात येते.