Holi 2025- नैसर्गिक रंगांच्या सोबतीने बिनधास्त खेळा होळी! घरी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी काय कराल?

रंग हे आपल्या आयुष्यात एक वेगळीच उर्जा निर्माण करतात. म्हणूनच रंगांना आपल्या दैनंदिन आयुष्यातही खूप महत्त्वाचे स्थान आहे. रोजच्या आयुष्यात जगताना रंग आपल्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब उमटवत असतात. पण होळीचे रंग मात्र आपल्या आयुष्यात एक धम्माल आनंद घेऊन येतात. रंगांची उधळण आणि होळीची गाणी यावर लहानांपासून मोठ्यांचे सर्वांचे पाय थिरकतात. रंगपंचमीचा आनंद अधिक गडद करायचा असेल तर, रासायनिक रंगांऐवजी घरी बनवलेले सेंद्रिय रंग वापरायला हवेत. अगदी घरबसल्या आपण काही मिनिटांमध्ये रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग बनवू शकतो. साध्या सोप्या पद्धतीने घरबसल्या नैसर्गिक रंग करुन, रंगपंचमीचा आनंद दुप्पट करा.

 

नैसर्गिक रंग कसे तयार कराल?

हिरवा रंग

सेंद्रिय पद्धतीने हिरवा रंग बनवणे खूप सोपे आहे. कोणतीही ताजी पालेभाजी घेऊन ती मिक्सरमध्ये ग्राईंड करा. यामध्ये आरारूट पावडर समान प्रमाणात मिसळा आणि मऊ गुलाल तयार करा. तुम्हाला रंग जास्त प्रमाणात करायचा असेल तर, मेंदी पावडर देखील वापरू शकता.

 

 

 

गुलाबी किंवा लाल गुलाल

गुलाबी किंवा लाल रंग बनवण्यासाठी बीटचे छोटे तुकडे करा आणि ते मिक्सरमध्ये बारीक करा. यामध्ये आरारुट पावडर घाला म्हणजे गुलाल मऊ होईल.

 

पिवळा रंग

पिवळा रंग करण्यासाठी बेसन आणि हळद पावडर मिसळून मिश्रण एकजीव करा. हा रंग केवळ खेळाचा आनंद वाढवणार नाही तर, हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो, जो त्वचेसाठी फायदेशीर असतो.

सेंद्रिय रंगाचे फायदे

 

होळीला सेंद्रिय रंगाचा वापर केल्यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही.

हानिकारक रसायनांपासून केसांचे संरक्षण होते.

सेंद्रिय रंग हे पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत कारण त्यामध्ये कोणतेही विषारी पदार्थ नसतात.