
होळी हा रंगांचा सण मानला जातो. परंतु रासायनिक रंग होळी खेळताना वापरले तर, आयुष्यभरासाठी अपंगत्व येण्याचाही धोका असतो. सध्याच्या घडीला बाजारात उपलब्ध असलेल्या रंगांमध्ये रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणूनच बाजारात रंग खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. बाजारातील रासायनिक रंगामुळे डोळे, त्वचा, केस, कान यांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमस्वरुपी अपंगत्वाचाही धोका संभवतो. म्हणूनच होळीचे रंग विकत घेताना किंवा खेळताना कोणते रंग नैसर्गिक आहेत आणि कोणते रासायनिक आहेत हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
रासायनिक रंग कसे ओळखायचे?
पाण्यात विरघळवून चाचणी करा
रासायनिक रंग ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते पाण्यात विरघळवून पाहणे. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात थोडा रंग मिसळा. रंग पाण्यात लगेच विरघळला आणि त्याचा रंग खूप गडद झाला तर तो रंग हा रासायनिक असू शकतो. नैसर्गिक रंग हलके असतात आणि पाण्यात हळूहळू विरघळतात.
रंग तुमच्या हातांवर घासुन बघा
तुम्हाला कोणत्याही रंगाबद्दल शंका असेल तर, सर्वात आधी तुमच्या हातांवर रंग घासा. रासायनिक रंग जास्त चिकट असतात आणि काढणे कठीण असते. नैसर्गिक रंग स्वच्छ करणे सोपे आहे आणि त्यामुळे कोणतीही जळजळ होत नाही.
रंगाचा वास घ्या
रासायनिक रंगांना अनेकदा पेट्रोलियम, डिझेल किंवा अमोनिया सारखा तीव्र वास येतो. एखाद्या रंगाला खूप तीव्र किंवा अनैसर्गिक वास येत असेल तर तो हानिकारक असू शकतो. नैसर्गिक रंगांना कोणताही रासायनिक वास नसतो.
त्वचेवर होणारा परिणाम
रंग लावल्यानंतर तुमच्या त्वचेवर जळजळ होत असेल, खाज येत असेल किंवा लाल पुरळ येत असेल तर तो रासायनिक रंग आहे.