लवकरच सुरू होत आहे होलाष्टक; शुभ कार्ये करण्यास का आहे मनाई…काय आहे कथा…

>> योगेश जोशी

कोकणात होळी म्हणजेच शिमगा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राज्यातही होळी उत्साहात साजरी होते. आता हा सण पुढील आठवड्यात होत आहे. मात्र, होळीपूर्वीचे आठ दिवस अभुभ मानले जातात. त्याला ज्योतिषामध्ये होलाष्टक असे म्हणतात. होलाष्टक म्हणजे होळीआधीचे आठ दिवस. याकाळात कोणतीही शुभकार्य करण्यात येत नाहीत. उत्तर हिंदुस्थानात याला खरमास असे म्हणतात. तिथे होळीपूर्वी 15 दिवस कोणतीही शुभकार्ये करण्यात येत नाहीत.

आपल्या संस्कृतीत होलाष्टक अशुभ मानले जाते. या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. होलाष्टकाच्या काळात शुभ कार्य केल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी मान्यता आहे. तसेच होलाष्टक दरम्यान कोणतेही शुभ कार्य केल्यास अनेक अडथळे येतात. होळीच्या आधीच्या आठ दिवसांना होलाष्टक म्हणतात. या काळात लग्न, मौंज, मुंडन आणि इतर धार्मिक विधी किंवा शुभ कार्ये करण्यास मनाई आहे. फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून म्हणजेच 7 मार्चपासून होलाष्टक सुरू होत आहे. ते होळीच्या दिवशी 13 मार्च रोजी संपणार आहे.

होलाष्टक अशुभ असल्याबाबतची कथा भक्त प्रल्हादशी संबंधित आहे. प्रल्हादने भगवान विष्णूची भक्ती सोडावी आणि आपल्यालाच देव मानावे, यासाठी त्याचा पिता हिरण्यकश्यपने होलाष्टकच्या आठ दिवसांत त्याचा अतोनात छळ केला. मात्र, भक्त प्रल्हाद भगवान विष्णूच्या कृपेने सर्स संकटातून तावूनसलाखून बाहेर आला. त्यानंतर त्याची भगवान विष्णूवरील भक्ती आणखी वाढली. त्यामुळे आता प्रल्हादाचा अंत करायचा, या हेतूने हिरण्यकश्यपने आगीत भस्मसात न होण्याचे वरदान मिळालेल्या आपल्या बहिणीला होलीकेला प्रल्हादला घेत अग्नीत प्रवेश करण्यास सांगितले. मात्र, त्या आगीत होलीका जळून भस्मसात झाली आणि प्रल्हाद सुखरुप बाहेर आला. तोव्हापासून होलिकादहन करण्याची प्रथा सुरू झाली. तसेच त्या आधी आठ दिवस भक्त प्रल्हादचा अतोनात छळ करण्यात आल्याने ते दिवस होलाष्टक आणि अशुभ मानले जाऊ लागले.