चीन, जपान, मलेशिया आणि दक्षिण कोरियाची धुळधाण उडवल्यानंतर आता शनिवारी पाकिस्तानविरुद्ध विजयाचा पंच मारण्यासाठी अपराजित हिंदुस्थानी हॉकी संघ सज्ज झाला आहे. आशियाई हॉकी अजिंक्यपद करंडकाच्या उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या हिंदुस्थानला सोमवारी गटात चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी उपांत्य फेरीत भिडावे लागणार आहे. उद्या शनिवारी हिंदुस्थान-पाकिस्तान, मलेशिया-दक्षिण कोरिया आणि जपान-चीन अशा अखेरच्या साखळी लढती खेळल्या जाणार असून गटात अव्वल चार संघ उपांत्य फेरीत भिडतील.
हिंदुस्थानसाठी यंदाची आशियाई अजिंक्यपद करंडक खूपच दमदार ठरला आहे. साखळीतील चारही लढतींत हिंदुस्थानने आपल्या प्रतिस्पर्धी संघांचा फडशा पाडला आहे. एकही संघ हिंदुस्थानसमोर नीटपणे उभा राहू शकेलला नाही. नॉनस्टॉप आणि धडाकेबाज विजयाची नोंद करणाऱ्या हिंदुस्थानला रोखणे पाकिस्तानसाठी खूप कठीण आहे. त्यामुळे फुल जोशात आणि जोमात असलेल्या हिंदुस्थानी संघ पाकिस्तानचाही पराभव करत सलग पाचव्या विजयाची नोंद करणार हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानविरुद्ध जिंको किंवा हरो, गटातील अव्वल स्थान पाकिस्तानही हिरावू शकणार नाही. पाकिस्तानने दोन विजयांसह दोन सामने बरोबरीत सोडवले आहेत. सध्या ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत, मात्र पराभूत झाल्यावर ते तिसऱ्या स्थानावर घसरू शकतात. त्यामुळे त्यांचीही उपांत्य फेरी निश्चित आहे. हिंदुस्थानचे अव्वल स्थान पक्के असल्यामुळे अन्य संघांना कोणते स्थान मिळते हे अखेरच्या साखळीनंतरच निश्चित होईल आणि तेव्हाच उपांत्य लढती स्पष्ट होतील.
अवघ्या जगाला या सामन्याची उत्सुकता
मी ज्युनियर असल्यापासून पाकिस्तानविरुद्ध खेळतोय. माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत आणि ते मला माझ्या भावासारखे आहेत. मैदानात आपल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवायचे असते. हॉकीत हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील लढतीला तोड नाही. जगभरातील हॉकीप्रेमी या सामन्याची आतुरतेने आणि उत्सुकतेने वाट पाहत आहेत, याची मला जाणीव आहे. या सामन्यापूर्वी आम्ही काय केले, याचा कधीच संबंध नसतो.
पाकिस्तान एक दमदार संघ आहे आणि तो कोणत्याही क्षणी सामन्यात कमबॅक करू शकतो इतकी क्षमता त्यांच्यात असल्याचे हिंदुस्थानी कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला. तसेच पाकिस्तानी कर्णधार अम्माद बट म्हणाला, हिंदुस्थान आतापर्यंत विजेत्यासारखा खेळलाय आणि आम्हीसुद्धा प्रत्येक सामन्यागणिक जोरदार कामगिरी करत आलोय. आम्ही शिस्तबद्ध हॉकी खेळलोय आणि उद्याही आम्ही तेच कायम ठेवणार आहोत.
हिंदुस्थान नॉनस्टॉप
हिंदुस्थानने स्पर्धेच्या पहिल्या लढतीपासूनच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो करून सोडलेय. चीनचा 3-0ने फडशा पाडल्यानंतर जपानचा 5-1 ने धुव्वा उडवला. मग मलेशियाची 8-1 अशी धुळधाण उडवली. त्यामुळे हिंदुस्थानचे सारेच खेळाडू सुपर फॉर्मात आहेत.अराईजीत सिंग, सुखजीत सिंग, हरमनप्रीत सिंग आणि राजकुमार पाल या चौघांनीही प्रत्येकी तीन-तीन गोल ठोकले आहे.
पालने मलेशियाविरुद्ध हॅटट्रिक ठोकलीय. तसेच पाकिस्तानच्या हन्नान शाहिदने चीन आणि कोरियाविरुद्ध प्रत्येकी दोन-दोन गोल ठोकले आहेत. त्याचप्रमाणे अहमद नदीमनेही तीन गोल केले असल्यामुळे पाकिस्तानचेही खेळाडू फॉर्मात असल्याचे दिसतेय. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यात कोण जोशात खेळतो आणि कोण यशाचे चुंबन घेतो, हे उद्याच दिसेल.
हिंदुस्थानचे पारडे जड
उद्याच्या सामन्यात हिंदुस्थानचे पारडे निश्चितच जड आहे. हांगझाऊ आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानने पाकिस्तानचा 10-2 ने दारुण पराभव केला होता. तसेच चेन्नईत झालेल्या आशियाई अजिंक्यपद करंडक स्पर्धेत 4-0ने धुळधाण उडवली होती. 2022मध्ये जकार्ता येथे झालेल्या युवा हिंदुस्थानी संघाला पाकिस्तानने 1-1 अशा बरोबरीत रोखले होते, तर 2021 च्या आशियाई अजिंक्यपद करंडकात पाकिस्तानला 4-3 ने हरवत कांस्य जिंकले होते.