घाटकोपर होर्डिंग दुर्घटना आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार

घाटकोपर येथे बेकायदा महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटने प्रकरणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. गृह विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यानुसार या समितीवर जाहिरात फलक आणि पेट्रोल पंपासाठी जबाबदार असलेल्या पंपनीच्या सहभागाची तपासणी करणे, पंपनीचा पूर्व इतिहास, आर्थिक व्यवहाराचा माग आणि विविध कार्यालये तसेच विविध संस्थांमधीन अधिकाऱयांशी संगनमत केल्याचा पुरावा तपासण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

24 मे 2024 रोजी घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात बेकायदा महाकाय फलक कोसळून 16 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या दुर्घटनेनंतर शहरातील जाहिरात फलक आणि त्यांची कायदेशीरता याबाबत प्रश्न निर्माण झाले होते.
– या चौकशी समितीत सदस्य म्हणून मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील अतिरिक्त पोलीस महासंचालक श्रेणीपेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी, आयआयटी मुंबईचे बाह्य संरचनेच्या सुरक्षेचे मूल्यांकन करण्याचा अनुभव असलेले स्ट्रक्चरल अभियंता, आर्थिक अनियमितता आणि कर चुकवेगिरीचा तपास करण्याचा अनुभव असलेला आयकर अधिकारी किंवा आयकर आयुक्त, आर्थिक तपास आणि लेखा परीक्षणात निपुण असलेले सनदी लेखाकार यांचा समावेश करण्यात आला आहे.