Hit & Run – नंदुरबारमध्ये भरधाव कारची मायलेकाला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

नंदुरबारमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव स्कॉर्पियो कारने रस्त्यावरून पायी चालणाऱ्या मायलेकाला जोरदार धडक दिली. या धडकेत मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पना गजानन वाघ आणि आकाश गजानन वाघ अशी मयत मायलेकांची नावे आहेत. दोघे सोमवारी रात्री 10 च्या सुमारास डोंगरगाव रस्त्यावरून पायी घरी चालले होते. यादरम्यान, भरधाव वेगात येणाऱ्या स्कॉर्पियो कारने त्यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

या मार्गावर गतिरोधक नसल्याने येथे अपघाताच्या घटना नेहमी घडत असतात. याबाबत स्थानिक नागरिकांनी या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याबाबत बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. मात्र बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळेच मायलेकाला जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.