
लंडनच्या म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा प्रचार करत ती महाराष्ट्रात आणू पाहणाऱ्या मिंधे सरकारच्या खोटेपणाचा आज कोथळाच निघाला. कोटय़वधी रुपये खर्चून आणली जाणारी ती वाघनखे शिवरायांची नाहीत, असा खुलासा म्युझियमनेच केला आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी त्यासंदर्भात केलेल्या पत्रव्यवहारात म्युझियमकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे वस्तुस्थिती माहिती असतानाही राजकीय फायद्यासाठी महाराजांच्या वाघनखांचा वापर करणारे मिंधे सरकार तोंडघशी पडले आहे.
लंडनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी मिंधे सरकारचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा गाजावाजा केला. लवकरच ती महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. परंतु ती शिवरायांची असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे लंडनच्या म्युझियमने इंद्रजीत सावंत यांना कळवले आहे. त्यासंदर्भात आपण म्युझियमकडे पत्रव्यवहार केला होता, अशी माहिती सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
लंडनमधील ती वाघनखे शिवरायांची नाहीत याबद्दल काही पुरावेही आपण म्युझियमला दिले होते आणि ते मान्य करत म्युझियमने त्यांच्याकडील माहितीत तसे बदलही केले आहेत. ती माहिती महाराष्ट्र सरकारने प्रदर्शनाच्या ठिकाणी ठळकपणे मांडावी अशा सूचनाही म्युझियमने करार करताना दिल्या आहेत, असेही सावंत यांनी सांगितले.
सरकारने आजपर्यंत या वाघनखांसंदर्भात जे जीआर काढले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखान वधावेळी वापरलेली वाघनखं असा उल्लेख केला आहे. पण प्रत्यक्षात सरकारचा हा दावा पूर्णतः चुकीचा आणि शिवप्रेमींची फसवणूक करणारा असल्याचे 17 जूनला व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलेल्या स्पष्टीकरणावरून दिसून येते, असे सावंत यांनी सांगितले. सामंजस्य करार करतेवेळी उपस्थित असणाऱया महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी मंडळाला ही माहिती स्पष्टपणे सांगण्यात आलेली होती. मात्र शासनाने आणि संबंधित अधिकारी यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती जनतेपासून लपवून ठेवली आणि शिवप्रेमींची दिशाभूल केली, असेही सावंत म्हणाले.
महाराजांची खरी वाघनखे साताऱ्यात
शिवरायांनी अफझलखान वधाच्या वेळी वापरलेली खरी वाघनखे साताऱ्याच्या बाहेरच गेलेली नाहीत, ती साताऱ्यामध्येच आहेत. ती साताऱ्यातून बाहेर गेल्याची किंवा कोणाला भेट दिल्याचा कोणताही पुरावा नाही. या वाघनखांबद्दल साताऱ्याचे उदयनराजे भोसले माहिती देऊ शकतात, असे इंद्रजीत सावंत यांनी सांगितले.
राजकारण नको – मुनगंटीवार
शिवरायांच्या वाघनखांवरून राजकारण करणे अयोग्य आहे. वाघनखे महाराष्ट्रात येण्याची वेळ साधून इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी त्याऐवजी सरकारला पुरावे द्यायला हवे होते. साताऱयात वाघनखे असती तर उदयनराजे भोसले यांनी लंडनमधून वाघनखे आणण्यासाठी पुढाकार घेतला नसता. साताऱयाच्या राजघराण्याकडे वाघनखे नाहीत तर शिवाजी महाराजांची तलवार आहे याची माहिती सावंत यांनी घ्यायला हवी. त्यांनी उदयनराजेंशी चर्चा केली असती तरी बऱयाच गोष्टी समजल्या असत्या, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
लंडनमधील वाघनखे शिवरायांची नाहीत, कारण…
– महाराष्ट्रात भाडेतत्त्वावर आणण्यात येणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत याचा कोणताही पुरावा नसल्याची कबुली व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने 19 जून 2024 रोजी पाठवलेल्या पत्रात दिली.
– ती वाघनखे ग्रँट डफ नावाच्या इंग्रज अधिकाऱयाच्या कुटुंबीयांकडून 1979मध्ये म्युझियमकडे भेट म्हणून आली होती. ती डफ यांच्याकडे कशी आली याचेही कागदोपत्री पुरावे नाहीत. 1818मध्ये ती डफ यांना मिळाली होती असा अंदाज आहे.
– ग्रँट डफच्या मुलाने सातारच्या छत्रपतींची भेट घेतली होती तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल वाघनखे तिथे पाहिल्याची नोंद त्याच्या पुस्तकात केली आहे. तसेच आपल्याकडे असलेली वाघनखे ही त्याची प्रतिकृती असल्याचेही त्याने मान्य केले आहे.
– हिंदुस्थानात 1857 ते 1893 दरम्यान एच. बेवरीज या इंग्रज अधिकाऱयाने डिस्ट्रीक मॅजिस्ट्रेटसारख्या उच्च पदांवर काम केले होते. ते इतिहासाचे अभ्यासक होते. 1921मध्ये पेंब्रिज विद्यापीठाकडून छापलेल्या त्यांच्या लेखात त्यांनी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांची प्रतिकृती आहे असे नमूद केले होते.
– सातारा छत्रपतींना भेट देणाऱया अनेक उच्चपदस्थ इंग्रज व हिंदुस्थानी अधिकाऱयांनी महाराजांची वाघनखे साताऱयात पाहिल्याची नोंद आहे.
– 1907 सालच्या मॉडर्न रिह्यूच्या अंकात साताऱयाच्या राजघराण्याकडे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा फोटो प्रकाशित झाला होता.
– लंडनच्या म्युझियममध्ये हिंदुस्थानातील विविध ठिकाणांहून आलेली 6 वाघनखे आहेत. जगभरातील अनेक संग्रहालयांत शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या प्रतिकृती उपलब्ध आहेत.