गिरगावच्या शांताराम चाळीच्या इतिहासाचे पान उघडले

अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि अनेक सभांनी गाजलेल्या गिरगावच्या शांताराम चाळीचा इतिहास आता पुस्तकरूपाने उलगडला आहे. चाळीच्या भव्य पटांगणात बुधवारी ‘शांताराम चाळीची स्मरणगाथा’ या पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव आणि स्वातंत्र संग्रामातील बहुमूल्य योगदानाचा इतिहास सर्वांना जाणून घेता येणार आहे.

भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात मुंबईने फार मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध ठोस जनमत तयार करणाऱ्या तसेच ब्रिटिश सरकारला मुळापासून हादरे देणाऱ्या 35पेक्षा जास्त सभा गिरगावातील शांताराम चाळीतील पटांगणात झाल्या होत्या. लोकमान्य टिळक, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी, बॅरिस्टर जीना अशा अनेक स्वातंत्र्य सेनांनीना ब्रिटिश सरकारविरुद्ध बोलण्यासाठी आणि जनजागृतीसाठी शांताराम चाळ ही हक्काचे व्यासपीठ होती. या सभांना हजारोंच्या संख्येने देशभक्तांची उपस्थिती असायची.

गणेशोत्सव मेळावे, शिवजयंतीनिमित्त सभा, असहकार चळवळ, स्वदेशीचा पुरस्कार, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी, लॉर्ड विलिंग्डन यांच्या अत्याचाराचा निषेध अशा घडामोडींवर ज्येष्ठ नेतेमंडळी जागृती करत होती. पडद्याआड गेलेला हा इतिहास पुस्तकात मांडला आहे.

अमेय जोशी यांनी पुस्तकासाठी एशियाटिक ग्रंथालय, मणिभवन, केसरीवाडा येथील संशोधन सामग्रीचा उपयोग केला आहे. डॉ. अपर्णा बेडेकर, विवेक छत्रे व पद्मजा बापये यांनी लेखन सहाय्य केले आहे.

‘शांताराम चाळीची स्मरणगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी करण्यात आले. या वेळी सल्लागार मांदार बेडेकर, मंडळाच्या अध्यक्षा अनघा बेडेकर, लेखक अमेय जोशी उपस्थित होते.

भित्तिचित्रे, देखावे अन् हेरिटेज वॉक

शांताराम चाळीचा हा सारा इतिहास पुस्तकरूपाने आज प्रकाशित झाला असला तरी यंदाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवात मंडळातर्फे भित्तिचित्रे, विविध देखावे आणि हेरिटेज वॉक या माध्यमातून इतिहास साकारला जाईल. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात या चाळीतील उत्सवाला सर्वांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन अनघा बेडेकर यांनी केले.