मराठय़ांच्या देदीप्यमान इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या साहाय्याने प्रतापगडाच्या पायथ्याला अफझलखानाचा वध केला होता, त्या ऐतिहासिक वाघनखांचे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात साताऱयात आगमन होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. या क्षणाचे सातारकरांनी साक्षीदार व्हावे, असे आवाहन येसूबाई फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केले आहे.
सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. संग्रहालयाच्या प्रदर्शनी दालनामध्ये विशेष बंदोबस्तात वाघनखे ठेवण्यात येणार आहेत. या वाघनखांना लंडनच्या म्युझियममधून जुलै महिन्यामध्ये एक वर्षासाठी महाराष्ट्रात आणण्यात येणार असून, दहा महिन्यांसाठी त्यांचे वास्तव्य शिवाजी संग्रहालयात राहणार आहे. याकरिता विशेष काचपेटीचे आयोजन करण्यात आले असून, हा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱयांमध्ये बंदिस्त राहणार आहे.
या वाघनखांच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त राहणार आहे. या पूर्वतयारीची पाहणी शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे व येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केली. नूतन दालने आणि ऐतिहासिक शिवकालीन साहित्यासह शिवाजी संग्रहालय सुसज्ज होत असून, लवकरच ते सातारकरांसाठी खुले होत आहे. शिवाजी संग्रहालयात वाघनखांचे आगमन हा मोठा ऐतिहासिक क्षण असणार आहे. या क्षणाचे सातारकरांना साक्षीदार होण्याची संधी आहे.
राजेशिर्के म्हणाले, ‘साताऱयाची भूमी ही ऐतिहासिक असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची अनुभूती देणाऱया अनेक घटनांमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा झालेला वध हा एक देदीप्यमान क्षण आहे. वाघनखे पुढील दहा महिन्यांसाठी शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. हा दुर्मिळ क्षण आहे. या क्षणाचे साक्षीदार सातारकरांनी निश्चित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.