ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात; शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आजपासून जनतेसाठी खुले

राज्य सरकारने गाजावाजा करून लंडनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममधून ऐतिहासिक वाघनखे  आणली आहेत. ही छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचे सरकारने म्हटले आहे. आज राजधानी सातारा येथील छत्रपती शिवाजी  महाराज संग्रहालयात ही वाघनखे ठेवण्यात आली असून उद्या शनिवारपासून ही ऐतिहासिक वाघनखे जनतेला पाहता येणार आहेत.

ऐतिहासिक वाघनखे तीन वर्षांसाठी करारावर महाराष्ट्रात आणली आहेत. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सातमहिने या वाघनखांचे जतन आणि संवर्धन केले  जाणार आहे. छत्रपती  शिवाजी महाराज संग्रहालयात आज शिवकालीन शस्त्रे प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियमचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमप्रमुख निकोलस मर्चंट, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते.

दिल्लीत राष्ट्रीय स्मारक व्हावे

उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावे, यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.

हिंदुस्थानचा नकाशा चुकीचा दाखवला

कार्यक्रमाच्या ध्वनिचित्रफीतीत मुनगंटीवार यांच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने गंभीर चूक केली. हिंदुस्थानच्या नकाशात पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानपासून वेगळा दाखवला आणि सियाचीनही एक रेषा खेचून वेगळे दाखवण्यात आले. त्यावरून सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राजकीय अजेंडा रेटण्याचा प्रयत्न

हा कार्यक्रम राजकीय नाही, असे म्हणतानाच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाघनखांआडून या कार्यक्रमात महाविकास आघाडीवर टीका करीत आपला राजकीय अजेंडा रेटल्याचे दिसून आले.

चार टपाल तिकिटांचे अनावरण

किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग, छत्रपती शिवरायांची राजमुद्रा व भक्ती-शक्ती संगम (छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज भेट) या चार टपाल तिकिटांचे यावेळी अनावरण झाले.

…तर देशाचे तुकडे झाले असते!

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्र करून रयतेचे स्वराज्य  निर्माण केले. सर्वधर्मसमभाव हा विचार त्यांनी दिला. देशाला केवळ  हा विचारच एकसंध ठेवू शकतो,’ अशी स्पष्ट भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या स्वराज्याच्या रूपाने लोकशाहीचा ढाचा मांडला. छत्रपती शिवरायांनी हा विचार दिला नसता तर देशाचे तुकडे झाले असते,’ असे त्यांनी सांगितले. विशाळगड हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ‘राजधर्म’च सांगितला.