मिंधे सरकारची नामुष्की, हिंजवडीतील 37 कंपन्या महाराष्ट्रातून परराज्यात

पुणे शहर आणि परिसराला वाहतूककोंडीचा अक्षरशः विळखा पडला आहे. त्याचा मोठा फटका आता आयटी उद्योगाला बसला आहे. रोजच्या वाहतूककोंडीच्या त्रासाला कंटाळून हिंजवडी आयटी पार्कमधील तब्बल 37 कंपन्यांनी राज्याबाहेर स्थलांतर केले आहे. तसेच आणखीन अनेक कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकामागून एक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असताना मिंधे सरकार मात्र हतबल झाले आहे.

पुण्यातील सर्वात ‘हॅपनिंग परिसर’ म्हणून केल्या काही वर्षांमध्ये हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, वाकड, पाषाण या परिसराचा विकास झाला. हिंजवडी आयटी पार्कमध्ये लहान-मोठय़ा सुमारे 150 कंपन्या आहेत. तिथे सुमारे 5 लाखांवर लोक काम करतात. हिंजवडीत आयटी कर्मचाऱयांच्या दिवसाला 1 लाख कार धावतात. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, वाहतूककोंडीमुळे कंपनीपर्यंत पोहोचायला कर्मचाऱयांना दीड ते दोन तास लागतात. लाखो रुपयांचे इंधन वाया जाते. शिवाय कंपन्यांचे तासाला 25 डॉलरचं नुकसान होत आहे. पावसाळ्यात तर समस्या आणखीनच गंभीर होते. त्यामुळे ट्रफिक जॅमच्या जाचाला कंटाळून हिंजवडीमधील 37 कंपन्या बाहेरच्या राज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. यातील काही कंपन्या हैदराबाद, चेन्नईत स्थलांतरित झाल्या आहेत. कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे आयटी उद्योगाला धक्का बसला आहे. वाहतूककोंडीची समस्या सोडवली नाही तर भविष्यात आणखी कंपन्या हिंजवडीतून इतर राज्यांत जातील. यामुळे पुण्यात रोजगाराची समस्या वाढेल. तसेच राज्याचे मोठे आर्थिक नुकसानही होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

फडणवीसांची घोषणा हवेत…
माण-हिंजवडीपासून शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळे ट्रफिक समस्या कमी होईल. हिंजवडी आयटी पार्कमधील मेट्रो स्टेशन स्काय बसने जोडले जाणार आहे. तसेच भूमिगत मेट्रो आणि रिंगरोडच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, स्काय बस प्रकल्पाची साधी चर्चादेखील नाही. रिंगरोडच्या कामाचा पत्ता नाही. तसेच मेट्रोचे काम अत्यंत धीम्यागतीने सुरू आहे. यामुळे वाहतूककोंडीतून पुणेकरांची सुटका कधी होणार, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हा मिंधे सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा – शिवसेना
हिंजवडीतील आयटी कंपन्या स्थलांतरित झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने हल्लाबोल केला आहे. ‘घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल 37 आयटी कंपन्या परराज्यांत स्थलांतरित झाल्या आहेत. एकापाठोपाठ एक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असतानाही मिंधे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसलंय. हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे. महाराष्ट्रातील तरुणांचे भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे’, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘एक्स’द्वारे केला आहे.

निष्काळजी सरकारमुळे उद्योग बाहेर जात आहेत…
महाराष्ट्राच्या हक्काचे रोजगार एकामागून एक बाहेर जात असताना राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यापूर्वीही महत्त्वाचे उद्योग बाहेर गेले. तरुणांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेतला गेला; परंतु सरकारला याबाबतीत लक्ष घालायला वेळ नाही. आता पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधून 37 कंपन्या बाहेर गेल्याचे समोर आले आहे. एक उद्योग बाहेर जातो तेव्हा त्यासोबत रोजगार आणि तरुणांचे भविष्यदेखील संकटात येते. महाराष्ट्रातील तरुणाई रोजगाराच्या शोधासाठी पायपीट करीत असून, या परिस्थितीला उद्योग टिकवून ठेवण्याबाबत निष्काळजी असणारे हे शासन कारणीभूत आहे, असे ट्विट करून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे जे काही रस्ते आहेत, त्या प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. रस्ते अरुंद झाल्याने वाहतूककोंडीची जास्तच भर पडत आहे. याचा आयटी अभियंत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूककोंडीसह आयटी पार्क परिसरात मूलभूत सुविधांची मोठी कमतरता असून, याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
– कर्नल योगेश जोशी, सचिव, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन

उद्योगमंत्र्यांना कल्पनाच नाही…
आयटी कंपन्यांच्या स्थलांतरामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत असताना, दुसरीकडे हिंजवडी ग्रामपंचायतीनेदेखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांना एका वृत्तवाहिनीने विचारले असता, त्यांना कोणतीच कल्पना नव्हती. माहिती घेतो, असे उत्तर उद्योगमंत्र्यांनी दिले.