तरुणाचा दगडाने ठेचून निघृण खून, दोन संशयित ताब्यात

हिंगोली तालुक्यातील बासंबा शिवारातील मराठवाडा ढाब्याच्या जवळील भोगाव पुलाजवळ एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

हिंगोली तालुक्यातील बासंबा फाटा ते सावरखेडा मार्गावरील मराठवाडा ढाब्याच्या जवळील भोगाव पुलाच्या परिसरात एका तरुणाचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आज शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बासंबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास आडे, पोलीस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, कैलास गुंजकर, गजानन कहऱ्हाळे, चंद्रशेखर काशिदे, बाबाराव धाबे, शेख उमर, प्रवीण राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तरुणाचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत दिसून आला.

मृतदेहाच्या जवळ मोठे दगड व एक लाकडी दांडके आढळून आले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बासंबा पोलिसांनी मयत तरुणाची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता असलेल्या तरुणाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, येळी येथील फेरोजखाँ फरीदखाँ पठाण हा काल शुक्रवारपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबियाला घटनास्थळी दाखल केले. त्याच्या आईने सदर मृतदेह आपला मुलगा फेरोजखाँ याचा असल्याचे सांगितले.

सदर तरुणाचा मृतदेह जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या दीड-दोन तासात दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.