हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (14 सप्टेंबर) सायंकाळी उशिराने उघडकीस आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील नंदिनी विरेंद्र तिवारी यांचा विवाह दोन महिन्यांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील प्रतिक करवा यांच्याशी झाला होता. मात्र, काही दिवसांपासून नंदिनी या हिंगोली येथील बहिणीकडे राहण्यासाठी आल्या होत्या. आज शनिवारी सकाळपासून नंदिनी या घरातून बाहेर गेल्या होत्या. दुपारपर्यंत घरी परत न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला होता. काही वेळानंतर नंदिनी यांचा त्यांच्या भावजींच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. त्यामध्ये तिने शहरातील हाॉटेल गणेश इन लॉजमध्ये रूम नंबर 102 मध्ये असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर कुटुंबियांनी लॉजकडे धाव घेऊन पाहणी केली असता, रूममधील पंख्याला नंदिनी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, संभाजी लेकुळे, धनंजय क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश दळवे यांनी भेट दिली. पोलिसांनी नंदिनी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी नंदिनी यांच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.