लोहरा पाझर तलाव फुटल्याने शंभर एकरावरील नुकसान  

सोमवारी सायंकाळ पासून जिल्ह्यात संतधार पाऊस सुरू झाला होता. या पावसामुळे हिंगोली तालुक्यातील लोहरा पाझर तलाव फुटल्याची घटना घडली. यामुळे पिंपळदरी व लोहरा येथील शेत जमिनी खरडून गेल्या आहेत. यामध्ये जवळपास १०० एकरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

 

हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक येथून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळदरी तर्फे बासंबा लोहरा पाझर तलाव आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी उशिराने हिंगोली जिल्ह्यात संतधार पाऊस झाला. या पावसामुळे रात्री उशिराने लोहरा पाझर तलाव फुटल्याची घटना घडली. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की पिंपळदरी लोहरा येथील शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. शेतामध्ये सर्वत्र पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. तसेच भटसांगवी येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे भटसांगवीसह, मांडवा व पेडगाव येथील शेत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. या ओढ्याच्या पाण्यामुळे या भागातील शेतकऱ्याचे ही मोठे नुकसान झाले आहे.‌ या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचे पथक लोहरा पाझर तलावामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र आज सकाळपासून पाऊस सुरू असल्यामुळे जवळपास शंभर एककरावरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दुपारी उशिरापर्यंत पाहणी सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

 

खासदार नागेश पाटील यांच्या प्रशासनाला सूचना –

हिंगोली तालुक्यातील लोहरा पाझर तलावाचे पाणी शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तत्काळ पाहणी करण्याचे निर्देश महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना भ्रमणध्वनी द्वारे दिले.‌