Hingoli Fire – हिंगोलीत धावत्या ट्रॅव्हलला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या बसमधून उड्या

धावत्या खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना हिंगोलीत सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. बसला आग लागताच जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी बसमधून उड्या घेतल्या. आगीत बस संपूर्ण जळून खाक झाली. प्रवाशांनी वेळीच बसमधून उड्या घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच औंढा नगरपंचायत प्रशासनाचे कर्मचारी आणि अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला.

सदर खासगी बस कर्नाटकहून नेपाळकडे चालली होती. बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. यादरम्यान दुपारच्या सुमारास हिंगोली-नांदेड महामार्गावरील औंढा शहराजवळ धावत्या बसने अचानक पेट घेतला. बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली.

बसला आग लागल्याचे पाहताच प्रवाशांनी घाबरुन आरडाओरडा सुरू केला. यानंतर जीव वाचवण्यासाठी बसमधून उड्या घेतल्या. आगीत बस जळून खाक झाली. मात्र चालकाने तात्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवल्याने प्रवाशांचे प्राण वाचले.