पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता उरलेसुरले आमचे रक्त घ्या अन् खायला गहू, तांदूळ, तेल द्या, असा आक्रोश करून हिंगोलीच्या गोरेगाव येथील शेतकर्यांनी राज्याच्या मिंधे सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या संतापजनक मागणीचे पत्रक पीक विम्याच्या निवेदनासोबत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील 5 लाखांहून अधिक शेतकर्यांना पीक विम्याचा लाभ मिळालाच नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अशात आज सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकर्यांनी पीक विम्यासह विविध मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने मिंधे सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला.
अवयव विक्रीला काढले तरी सरकार ढिम्म
जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात 3 लाख 26 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्यांना 25 टक्के नुकसानभरपाई देण्यासाठी सुमारे 172 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने हा प्रस्ताव नाकारल्यामुळे जिल्ह्यातील 5 लाख 12 हजार 439 शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिले. गोरेगाव येथील शेतकर्यांनी काही दिवसांपासून पीक विम्यासाठी अनेक आंदोलने केली. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी 10 शेतकर्यांनी स्वतःचे अवयव विक्रीला काढले होते. तरीही मिंधे सरकारने शेतकर्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.
शेतकर्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी सरकारने आमच्या शरीरातील रक्त घ्यावे अन् आम्हाला 10 किलो गहू, 5 किलो तांदूळ व 1 किलो गोडतेल द्यावे, अशा आशयाचे पत्रक लावून मिंधे सरकारचा निषेध करून शेतकर्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले. या निवेदनावर शेतकरी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रवीण मते, विजय कावरखे, राहुल कावरखे, संजय मुळे व सतीश वैद्य आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
आमदार मुटकुळे शेतकर्यांना कधी भेटणार?
पीक विम्यासाठी गोरेगाव येथील कर्जबाजारी शेतकरी काही दिवसांपासून आंदोलन करत असताना भाजप आमदार तानाजी मुटकुळे इतर कामांचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. मात्र, आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी येत नाहीत. आम्ही शेतकरी त्यांना 15 टक्के कमिशन देऊ शकत नाहीत. त्यामुळे आमदार मुटकुळे यांनी जिल्ह्यातील पीक विम्याचे काय झाले? यासह वन्यप्राणी बंदोबस्ताचे काय?, सोयाबीन व कापूस भाववाढीचे काय? अतिवृष्टीच्या अनुदानाचे काय?, शेतकरी आत्महत्येचे काय?, शेतकरी कर्जमाफीचे काय? या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे गोरेगाव येथील शेतकरी गजानन कावरखे म्हणाले.