
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही कधी हिंदू झालात? एक सुंदर वाक्य आहे, ‘जो जितका पापी, पाखंडी आणि कपटी असतो, तो हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो. आम्ही ते करत नाही, आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे बाळकडू दिले आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला घडवला.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या निर्धार शिबिरामध्ये संजय राऊत यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. राऊत म्हणाले, अनेकांना वाटलं की, शिवसेनेचा पराभव झाला, तर शिवसैनिक खचला असेल, घरी बसला असेल. शिवसैनिक आता घराबाहेर पडणार नाही. शिवसैनिक दहशतीखाली आहे. मात्र आजच्या शिबिराने दाखवून दिलं की, नाशिकचा शिवसैनिक आहे तसाच दणदणीत आणि खणखणीत आहे. एखाद्दुसऱया पराभवाने खचून जाणारे आम्ही नाही. यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिला आहे, स्वतः शिवसेनाप्रमुखांनी अनुभवला आहे. सगळ्यात खराब काळाशी सामना करणारी जी व्यक्ती असते, ती सगळ्यात उज्ज्वल भविष्याचा निर्माता होते.
आता पौर्णिमा, अमावस्या आली की भीती वाटते…
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी आणि चष्मा. आज हे महाशय परत गावी साताऱयाला गेले आहेत. मला आता भीती वाटते, अशी मुश्किल टिप्पणी करून संजय राऊत म्हणाले, आज पौर्णिमा, अमावस्या आहे की काय? कोणाचा बकरा कापणार आहे? आता महाराष्ट्राला पौर्णिमा, अमावस्या आली की भीती वाटते. इतका अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीही झाला नव्हता. हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाळासाहेबांचा हा महाराष्ट्र आहे.
आम्ही आमच्या नेत्यांच्या मागे ठामपणे उभे राहू
नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे हिंदुत्वाचे ढोंग आम्ही करत नाही. आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी बाळकडू दिलं आहे. आजच्या शिबिरात तोच एक संदेश आहे की, आम्ही लढायला तयार आहोत. तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला आम्ही सज्ज आहोत. आम्ही आमच्या नेत्याच्या मागे महाराष्ट्रात आणि देशात ठामपणे उभे राहू आणि तुमचं जे ढोंग आणि पाखंड आहे, हे उघडं पाडू.
…म्हणूनच दर्गा हटवण्यासाठी आजचा मुहूर्त निवडला
भाजपाचे लोक कधी, कुठे दंगल घडवायची याचे मुहूर्त आधी काढतात, पंचांग घेऊनच बसलेले असतात. नाशिकमध्ये होत असलेल्या शिवसेनेच्या निर्धार शिबिरावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच दर्गा हटाव मोहिमेला आजचा दिवस निवडला, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जे देशच तोडायला निघालेत, त्यांनी दर्गे तोडले तर आश्चर्य वाटायला नकोच. दंगल घडणं, पोलीस जखमी होणं चुकीचंच, दर्ग्यावर कारवाई ते नंतरही करू शकत होते. पण त्यांनी आजचाच दिवस निवडला, कारण त्यांना शिवसेनेची भीती वाटते, त्यांना वातावरण खराब करायचे आहे, अशी टीका त्यांनी सत्ताधाऱयांवर केली.
मन के जीते जीत है…
एक ‘छावा’ नावाचा चित्रपट येऊन गेला. त्यामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा संघर्ष पाहिला. तोच संघर्ष आपल्या शिवसेनेच्या वाटेला आला आहे. त्या काळात कवी कलश होते. छत्रपती संभाजी महाराज जेव्हा निराश झाले, चारीबाजूने घेरले गेले. काय करावं असा जेव्हा त्यांना प्रश्न पडला, तेव्हा कवी कलश यांनी त्यांना एक मंत्र दिला, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे, उन पर है धिक्कार, हा मंत्र आपल्या शिवसैनिकांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे.