हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आलेल्या बांगलादेश क्रिकेट संघाला आता ठिकठिकाणी विरोध सुरू झाला आहे. बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर सुरू असलेल्या अत्याचाराचे तीव्र पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे 27 सप्टेबरला कानपूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीला, तर 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेरमध्ये होणाऱ्या टी-20 सामन्याला हिंदुस्थानी नागरिकांनी विरोध केला आहे.
अखिल भारतीय हिंदू महासभेच्या 20 सदस्यांनी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवरील गेट नंबर बीच्या समोर रस्ता रोको करीत रस्त्यावरच हवन सुरू केले. या सर्वांवर एफआरआय दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कानपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हरीश चंदर यांनी अतिरिक्त पोलीस दलाची कुमक मागविली आहे. हिंदुस्थान आणि बांगलादेशचा संघ मंगळवारीच कानपूरमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये व हॉटेलबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रीन पार्क स्टेडियमची तीन टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. डीसीपी, एडीसीपी क एसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांकडे या तीनही टप्प्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोशल मीडियावरील भडकावू पोस्टवरही पोलीस खात्याची करडी नजर असणार आहे. बांगलादेश क्रिकेट संघाच्या दौऱ्यात विघ्न आणणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही हरीश चंदर यांनी दिला आहे.
हिंदू महासभेकडून ग्वाल्हेर बंदची हाक
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये 6 ऑक्टोबरला हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यात टी-20 क्रिकेट सामना रंगणार आहे. मात्र हिंदू महासभेने 6 ऑक्टोबरलाच ग्वाल्हेर बंदीची हाक दिली आहे. बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर अजूनही अत्याचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशसोबत क्रिकेट खेळणे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही सामन्याच्या दिवशीच ग्वाल्हेर बंदची हाक दिली आहे, असे हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी सांगितले.
मालिका रद्द करण्यासाठी पंतप्रधानांना रक्ताने लिहिले पत्र
ज्या बांगलादेशच्या भूमीवर हिंदूंवर अत्याचार झाले त्या बांगलादेशी संघासोबत हिंदुस्थानी भूमीवर क्रिकेटचे सामने खपवून घेणार नाहीत, असा इशारा अखिल भारतीय हिंदू महासभेने दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी हिंदू महासभेने केली आहे. यासाठी हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या रक्ताद्वारे पत्र लिहीत पंतप्रधानांकडे मालिका रद्द करण्याची मागणी गेल्या महिन्यातच केली होती. एकीकडे बांगलादेशात हिंसाचारात हिंदूंवर अत्याचार करून त्यांची कत्तल केली जात आहे, हिंदूंची घरे जाळली जात आहेत. अशा परिस्थितीत आपल्या देशाच्या क्रिकेट संघाचा सामना बांगलादेशविरुद्ध होतोय, हे आपले दुर्दैव असल्याची भावनाही हिंदू महासभेने व्यक्त केली आहे.