मुंबईत 10 लाख बांगलादेशी घुसखोर; शोधमोहीम राबवून कारवाई करण्याची हिंदू संघटनांची मागणी

महाराष्ट्रात 80 लाख ते 1 कोटी तर मुंबईत आठ ते दहा लाख बांगलादेशी घुसखोर असून ते नारळपाणी, भाजी, मासे, भंगारविक्रीसारखे काम करत असल्याचा दावा हिंदू जनजागृती समितीने केला आहे. या बांगलादेशी घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी शोधमोहीम राबवावी आणि घुसखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला करणारा मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आल्यानंतर बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहजाद हा नाव बदलून मुंबईत वास्तव्य करत असल्याचेही चौकशीत उघड झाले होते. रत्नागिरीच्या चिपळूणमध्येही 13 बांगलादेशी नागरिक सापडले होते. नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या जिह्यांमध्येही बांगलादेशी घुसखोर हिंदू नावे लावून वास्तव्य करत असल्याचा आरोप सनातन संस्थेचे प्रवत्ते अभय वर्तक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

घुसखोरांना परदेशातून फंडिंग

एक लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये समोर आला होता. बांगलादेशी घुसखोर मुंबई, महाराष्ट्रातील व्यवसायांमध्ये घुसले असून स्थानिक व्यावसायिकांपेक्षा स्वस्त दराने वस्तू विकून त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त करत आहेत. यासाठी त्यांना परदेशातून फंडिंग होत असावे, असा दाट संशय असल्याचे यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे अॅड. राहुल पाटकर म्हणाले.

धारावी पुनर्विकासात बांगलादेशींची घुसखोरी

धारावी पुनर्विकास प्रकल्पात लाखो घरांची निर्मिती होणार आहे. बनावट कागदपत्रे बनवून त्यात बांगलादेशींची घुसखोरी होऊ शकते, असे हिंदू जनजागृती समितीचे प्रवत्ते सतीश कोचरेकर यावेळी म्हणाले. बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्यासाठी समितीच्या वतीने राज्यात आंदोलने, मोर्चे, स्वाक्षरी अभियानाच्या माध्यमातून मोहीम राबवली जाणार असून त्यात जनतेनेही सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.