हिंदू समाज हा देशातील जबाबदार समाज, सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

लोक नेहमी विचारतात की, आम्ही केवळ हिंदू समाजावरच का लक्ष केंद्रित करतो. त्याला माझे उत्तर आहे, हिंदू समाज हा देशातील जबाबदार समाज आहे, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. जगातील विविधतेचा स्वीकार करण्यावरही त्यांनी जोर दिला आणि एकतेतच विविधता सामावलेली आहे असे हिंदू समाज मानतो, असेही मोहन भागवत म्हणाले. पश्चिम बंगालमधील बर्धमान येथील मैदानात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आज कुठलाही विशेष कार्यक्रम नाही, परंतु ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत माहिती नाही ते मला नेहमी विचारतात, संघाला नेमके काय हवे? जर मला याचे उत्तर द्यावे लागले तर मी म्हणेन, संघाला हिंदू समाजाला संघटित करायचे आहे. कारण, हा समाज देशातील जबाबदार समाज आहे, असे भागवत म्हणाले. हिंदुस्थान केवळ भूगोल नाही, तर एक प्रकृती आहे. काही लोक या मूल्यांनुसार जगू शकत नाहीत. त्यांनी वेगळा देश निर्माण केला. तर जे लोक इथे राहिले त्यांनी स्वाभाविकरीत्या हिंदुस्थानची मूळ तत्त्वे अंगिकारली आणि हे मूळ तत्त्व हिंदू समाज आहे, असेही भागवत म्हणाले.