गेल्या वर्षी अदानी समूहातील गैरव्यवहाराचा गौप्यस्फोट करणाऱ्या ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने शनिवारी थेट सेबीवरच बॉम्ब टाकला. सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बूच व त्यांच्या पतीची अदानी समूहाच्या कंपनीत भागीदारी आहे. त्यामुळेच सेबीने शेअर्स किमतीतील हेराफेरी, मनी लॉण्डरिंग आदी गंभीर आरोपांनंतरही अदानी समूहावर 18 महिन्यांत कोणतीच कारवाई केली नाही, असा गौप्यस्फोट ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने केला. शेअर बाजारातील घोटाळय़ाचा तपास करणारी संस्थाच फुटल्याचे यातून उघड झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
अमेरिकन कंपनी ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने शनिवारी सकाळी सोशल मीडियात ‘एक्स’वर पोस्ट शेअर केली होती. हिंदुस्थानात लवकरच काहीतरी मोठे घडणार, असे कंपनीने जाहीर केले होते. त्या पोस्टने देशातील उद्योगविश्वात अस्वस्थता वाढली होती. याचदरम्यान रात्री नवीन पोस्ट शेअर करून थेट सेबी आणि गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या कनेक्शनची पोलखोल केली. अदानी समूहातील घोटाळय़ात वापर केलेल्या ‘ऑफशोर कंपन्यां’मध्ये सेबीच्या प्रमुख माधवी बूच व त्यांच्या पतीची भागीदारी आहे. याच भागीदारीमुळे सेबीने अदानी समूहाची मागील 18 महिने पाठराखण केली आणि गंभीर आरोपांनंतरही कारवाई केली नाही, असा दावा ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने केला आहे.
सेबीने ‘हिंडनबर्ग’ला पाठवली होती नोटीस
जूनमध्ये सेबीने ‘हिंडनबर्ग’ला हिंदुस्थानमधील नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून नोटीस बजावली होती. ‘हिंडनबर्ग’ने पहिल्यांदाच आपल्या अहवालात कोटक बँकेच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला होता. त्यानंतर कोटक बँकेच्या शेअर मूल्यामध्ये मोठी घसरण झाली होती. ‘हिंडनबर्ग’ने सेबीची नोटीस ‘बकवास’ असल्याचे म्हटले होते. हा हिंदुस्थानातील प्रभावशाली व्यक्तींनी केलेला भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न आहे, असा सडेतोड दावाही ‘हिंडनबर्ग’ने केला होता.
धक्कादायक आरोप
एप्रिल 2017 ते मार्च 2022 या कालावधीत माधवी बूच सेबीच्या पूर्णवेळ सदस्य असण्याबरोबरच प्रमुख होत्या. त्यांची सिंगापूरमध्ये अगोरा पार्टनर्स नावाने कन्सल्टिंग कंपनीमध्ये 100 टक्के भागीदारी होती. 16 मार्च 2022 रोजी सेबीच्या प्रमुखपदी नियुक्ती होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी कंपनीतील आपले शेअर्स पती धवल बूचच्या नावावर वर्ग केले होते.
मॉरिशसमध्ये अदानी उद्योग समूहाचा मोठय़ा प्रमाणावर काळा पैसा असल्याची माहिती दिली होती. ती माहिती देऊन 18 महिने उलटले, त्यानंतरही सेबीने अदानी समूहाविरुद्ध कारवाई केली नाही. सेबीप्रमुख आणि अदानी समूह यांच्यात असलेली भागीदारी हेच कारवाई न होण्यामागील कारण आहे.
अदानी समूहावर कारवाई करण्याऐवजी सेबीने जून 2024 मध्ये आम्हालाच ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली. यावरून सेबीप्रमुख आणि अदानी समूहाच्या घनिष्ट संबंधांचा उलगडा होत आहे. सेबीला आमच्या दाव्यावर कुठला आक्षेप घेता आला नाही. केवळ पुरावे अपुरे असल्याचे जुजबी उत्तर दिले.