>> हिमांशू भूषण स्मार्त
एखादी वस्तू किंवा साधन जेव्हा तुम्ही वापरत असता, तेव्हा तुम्ही निव्वळ आर्थिक विधान करत नसता. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक विधानही करत असता. नाटकात माणसे असतात आणि नाटकातल्या माणसांच्या आयुष्यात वस्तू असतात. वस्तू जेव्हा नाटकाचा भाग बनतात तेव्हा त्या जीवनात असतात त्याहून विशेष बनतात. नाटकात त्या नाटय़ानुभवाचे आणि नाटय़ाशयाचे चिन्ह बनतात. प्रसंगी नाटय़च बनतात.
माणसाच्या आयुष्यामध्ये वस्तूंचे स्थान असते सुलभकरणाचे. म्हणूनच माणसाच्या आयुष्यात-दिपामात असणाऱया अनेक वस्तू त्याच्या ज्ञानेंद्रियांचे किंवा कर्मेंद्रियांचे विस्तार असतात. वस्तूंमुळे माणूस जैविक मर्यादा उल्लंघू शकतो. भविष्यात लागणाऱया भुकेसाठी तो अन्न संचय करतो तो वस्तूंच्याच माध्यमातून. वाहनांनी माणसाच्या पायांच्या मर्यादा ओलांडल्या. पाय मर्यादित अंतर कापू शकतात, त्यांची क्षमता संपली की ते थकतात. त्यांच्या वेगावर मर्यादा असतात. वाहन तुलनेने खूपच अधिक अंतर कापते. त्याचा वेग पायांहून कितीतरी अधिक असतो. दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शक डोळ्यांच्या मर्यादा ओलांडतात, परंतु हे वस्तूंचे साधनांचे सुलभीकरण माणसाच्या आयुष्यात सहजासहजी येत नाही. आधुनिक माणसाच्या आयुष्यात तर नाहीच नाही. त्यासाठी माणसाला विशिष्ट श्रेणीचा भाग व्हावे लागते. वस्तूपोटी प्रसंगी त्याला स्वत्वाची किंमतही मोजावी लागते. वस्तू मानवी समाजाच्या उत्पादन व्यवस्थेचा-विनिमय व्यवहाराचा भाग असतात. कोणतीही वस्तू-साधन, संकल्पनेच्या, उत्पादनाच्या आणि वापराच्या स्तरावर एक संप्रेषक चिन्हही असते. ती निव्वळ संकल्पली जाणारी, उत्पादित होणारी किंवा वापरली जाणारी वस्तू नसतेच. वस्तूला उपयुक्तता असते, मूल्य असते आणि अर्थही असतो. उन्नत होत गेलेले वस्तूंचे आणि साधनांचे विश्व हे मानवाला मानवेतरांहून वेगळे ठरवणारे मूल्य आहे. एखादी वस्तू किंवा साधन जेव्हा तुम्ही वापरत असता, तेव्हा तुम्ही निव्वळ आर्थिक विधान करत नसता. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक विधानही करत असता. प्रसंगी मनोव्यवहारनिष्ठ विधानही करत असता. वस्तू जीवनात येण्याचा व्यवहार आपल्याला केवळ आर्थिक व्यवहाराचा अथवा जीवनपूरक व्यवहाराचा भाग वाटला तरी तो तसा नसतो.
या साऱया चर्चेचा नाटय़विषयक लेखनाशी काय संबंध? तर नाटकात माणसे असतात आणि नाटकातल्या माणसांच्या आयुष्यात वस्तू असतात. वस्तू जेव्हा नाटकाचा भाग बनतात तेव्हा त्या जीवनात असतात त्याहून विशेष बनतात. नाटकात त्या नाटय़ानुभवाचे आणि नाटय़ाशयाचे चिन्ह बनतात. प्रसंगी नाटय़च बनतात.
1990च्या दशकात लिहिलेले विजय तेंडुलकरांचे ‘सफर’ नावाचे नाटक आहे. तेंडुलकरांच्या अन्य नाटकांएवढी या नाटकाची चर्चा झाली नाही. एक तर ते तेंडुलकरांची अनेक अन्य नाटके आहेत त्या पद्धतीने वास्तवकेंद्री नाही. तेंडुलकरांनी सामाजिक, राजकीय, मानसिक वास्तवांचे असंख्य छेद घेतले. त्यांनी या वास्तवांमधली उग्रता उघडी केली. ‘सफर’देखील मनोवास्तवाचा वेध घेतेच, परंतु ते बाज स्वीकारते अतिवास्तवाचा. मराठीमध्ये या नाटकाची फारशी चर्चा झाली नसली तरी त्याचे ‘द सायकलिस्ट’ या नावाने इंग्रजीत प्रयोग झालेले आहेत. तेंडुलकरांच्या अन्य नाटकांप्रमाणे मध्यमवर्ग हाच या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. खुजा, भिरु, दांभिक, स्वमग्न.
वयाची चाळिशी ओलांडली तरी आई-वडिलांची छाया न त्यागता आलेला पुरुष या नाटकाची प्रधान व्यक्तिरेखा आहे. एके दिवशी हा पुरुष ठरवतो की, जगप्रवासाला जायचे. बस झाले कुटुंबाच्या सुरक्षित छायेत वावरणे. अर्थातच आई-वडील त्याला समजावून पाहतात, परंतु हा ऐकत नाही आणि सायकलवरून जगप्रवासाला बाहेर पडतो. या प्रवासात त्याला अनेक मानवी-अमानवी व्यक्तिरेखा भेटतात. आपण या टिपणाच्या आरंभी ज्या वस्तुविश्वाविषयी बोललो त्याचा संदर्भ इथे येतो. हा पुरुष जगप्रवासाला जाण्यासाठी जे वाहन निवडतो ते असते एक्झरसाइजर.. व्यायामाची सायकल. जी चालवून आपल्याला खूप दमता येते, पण आपण कुठेच पोहोचत नाही. या सायकलचे पेडल्स तुम्ही खूप वेळ मारत राहू शकता, सायकलचे चाक खूप वेगाने फिरू शकते, पण ते आपली जागा सोडत नाही. कितीही दमलात तरी तुम्ही तिथेच असता, जिथे सुरुवातीला होतात. बरं, हे तुम्ही व्यायामाच्या हेतूने करत असाल तर तुमचा हेतू तरी साध्य होतो. तुम्ही हे वाहन प्रवासाला निवडलेले असेल तर एकतर तुम्हाला प्रवास करायचाच नसतो, निव्वळ दमायचे असते किंवा तुम्हाला आपण प्रवास करत नाही, आपण साचलेल्या डबक्यासारखे झालेलो आहोत या अपराध भावावर मात करायची असते. तीही प्रवास करून कुठेही न पोहोचता. कारण प्रवासाने येणारी वैविध्याची जोखीम तुम्हाला अंगावर घ्यायची नसते. जगप्रवासाला निघालेला मनुष्य, त्याचे पेडल्स मारणे जेव्हा रंगमंचावर दिसेल तेव्हा प्रेक्षकांना त्या दृश्यानुभवामधली तीव्र विसंगती तत्काळ ध्यानात येईल. त्यांच्या अनुभवात एक्झरसाइजरची पाकार गती तर साकार होत असेलच, परंतु त्या गतीची स्थितीबद्ध परिवर्तनहीनताही साकार होत असेल.
तेंडुलकरांनी केलेली वस्तू साधनाची निवड सफर या नाटकाला दृश्यानुभवाच्या, नाटय़ानुभवाच्या आणि नाटय़ाशयाच्या अत्यंत सूक्ष्म स्तरापर्यंत घेऊन जाते. एक वस्तू तिची सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय समग्रता सोबत आणते आणि नाटय़चिन्ह बनते. या लक्षणीय चिन्ह निवडीमुळे तेंडुलकरांना चिन्हांच्या स्तरावर मितव्यही राहता येते आणि प्रमुख पात्राच्या व्यामिश्र मनोव्यापारात शिरण्यासाठी, तो विस्तारून बघण्यासाठी मुबलक नाटय़ावकाशही प्राप्त होतो. अशा वस्तुरूप चिन्हामुळे नाटकातले स्पष्टीकरणांचे सुलभीकरणांचे काम संपते. नाटकाला नाटक राहता येते. भाषेला नेमके-संपृप्त, तर संवादांना बेतशुद्ध आणि अपर्यायी होता येते. आजवर दुर्लक्षित राहिलेला असला तरी ‘मराठी नाटकातील वस्तुविश्व’ हा स्वतंत्रपणे करण्याच्या संशोधनाचा विषय नक्कीच ठरू शकतो.
(लेखक नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)