नाटय़रंग- नाटकाचे घर

>> हिमांशू भूषण स्मार्त

भविष्यातल्या नाटकाची घरे ठरावीत अशा जागा महाराष्ट्रात निर्माण होत आहेत. शासनावर अवलंबून न राहता त्या नाटक करणाऱयांकडून निर्माण होत आहेत. नाटक करणारेच या जागा जगवतील, विकसित करतील. दिव्याने दिवा पेटावा तशी या घरांच्या निर्माणची प्रेरणा सबंध महाराष्ट्रभर पसरेल. उत्सवापलीकडची आणि

सातत्याने, दीर्घकाळ सर्जन प्रक्रिया साधू पाहणाऱया नाटय़ समूहांना, संस्थांना या घरांचा मोठाच दिलासा असेल.

“आज वास्तविक मराठी रंगभूमीला नांदायला स्वतची घरं नाहीत! अजूनही ती उघडय़ावर पडली आहे, पण आज ना उद्या ती प्रत्येक जिह्याच्या ठिकाणी चांगल्या बंदिस्त थिएटरात नांदेल. पुन्हा पाच-पंचवीस नाटक मंडळ्या आपले संसार उभे करतील.’’ – पु. ल. देशपांडे, नाटकवेडा महाराष्ट्र – एक शून्य मी.

पु. ल. देशपांडे यांनी 1961साली नोंदवलेली ही स्थिती आहे. या परिस्थितीमध्ये आज बदल झालेला आहे काय? वास्तविक पाहता आज महाराष्ट्रभर विपुल प्रमाणात एकांकिकांचे प्रयोग होत आहेत. ते प्रामुख्याने स्पर्धांमध्ये होत असले तरी होत आहेत. असंख्य एकांकिका स्पर्धा दरवर्षी नव्याने सुरू होत आहेत. महाराष्ट्रभर त्यांची केंद्रे असतात. या केंद्रांवरच्या प्राथमिक फेऱयांमधून निवडलेले संघ अंतिम फेरीत पोहोचतात. एकांकिका करणाऱया संघांची संख्याही आश्चर्यकारकरित्या खूप मोठी आहे. राज्य नाटय़ स्पर्धेसाठी महाराष्ट्रभर जिल्हानिहाय केंद्रे आहेत. तिथेही लक्षणीय संख्येने नाटके होत असतात. काही ठिकाणी तर महिना महिनाभर स्पर्धा चालते. ही परिस्थिती खरे तर समाधानकारक मानायला हवी, परंतु स्पर्धांचा काळ वगळला तर एरवी काय चालते? पु. ल. देशपांडे म्हणतात ते ‘नाटकाला नांदण्यासाठीचे घर’ म्हणजे केवळ रंगगृहे नाहीत, थिएटर्स नाहीत. घर म्हणजे एखाद्या कुटुंबाच्या विश्रांतीचे आणि विकसित होण्याचे अवकाश असते. घराच्या छपराखालचा ठहराव आपल्याला आत्मभानाची आणि आत्मशोधाची ऊर्जा देतो. घर ही आपल्या विकसित होत जाणाऱया अस्तित्वाची निरंतरता असते. या अर्थाने मराठी नाटकाला आज किती हक्काची घरे आहेत आणि ती नसतील तर आपण ती उभारण्याच्या दिशेने कार्यरत आहोत काय? की नाटकालाही केवळ उत्सवप्रियतेचा दोष ग्रासू लागलेला आहे. नाटकवेडा म्हणवल्या जाणाऱया महाराष्ट्राच्या पसंती क्रमांमध्ये नाटक खरोखरीच राहिलेले आहे काय?

कोल्हापूरमधले एक शतकाहून अधिक काळ नाटक जोपासणारे केशवराव भोसले नाटय़गृह आगीत भस्मसात झाले आणि नाटकाच्या घरांचा प्रश्न जास्तच तीव्रपणे समोर आला. केशवराव नाटय़गृह आगीत भस्मसात झाल्याच्या बातमीसोबतच पुद्दुचेरीचे
‘इंडियानॉस्ट्रम‘ हे थिएटर बंद झाल्याचीही बातमी आली. पुद्दुचेरीच्या या थिएटरमध्ये हिंदुस्थानमधल्या नाना भागातले रंगकर्मी नाटक शिकायला-करायला जात असत. केशवरावच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर हादरून गेले. त्यामध्ये राजर्षी शाहूंचा वारसा न सांभाळता आल्याची तीव्र सल होती आणि नाटक पोरकं झाल्याची विलक्षण वेदनाही होती. इंडियानॉस्ट्रमच्या संचालकांचे आणि रंगकर्मींचेही हेच झाले असणार. नाटकाचे विस्थापन हे केवळ रंगकर्मींसाठीच घातक असते असे नाही, ते संपूर्ण समाजाच्या प्रकृतीसाठीसुद्धा तितकेच घातक असते. मनोरंजनाचे एकाहून अधिक सुलभ, सहजसाध्य पर्याय उपलब्ध असणाऱयांसाठी कदाचित या घटना अनुल्लेखनीय असू शकतात. परंतु अशा जागांमधून नाटकाला हळूहळू पोषण घेत विकसित होण्यासाठी अवकाश मिळत असते. बिया जशा कोंब फुटण्याआधी भूमीत पडून राहतात आणि अनुकूल वातावरणात वृक्षात पालटण्याचा प्रवास सुरू करतात, अगदी तसेच नाटकाचे नाटकाच्या घरात होत असते. या प्रवासात नाटकाला जे गवसते आणि नाटकामधून पुढे जे प्रेक्षकांना गवसते, ते जीवनार्थासाठी अत्यंत मोलाचे आणि अपर्यायी असते.

या साऱयात सर्वात त्रासाचा एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे या विस्थापनांमुळे एक समाज म्हणून आपल्याला काही फरक पडणार आहे की नाही हा! जागांना पर्यायी जागा निर्माण होतात. कोल्हापुरातही नाटय़ प्रयोगांसाठी पर्यायी जागा उपलब्ध झाली. जुन्या स्वरूपातील हेरिटेज बांधणीसह केशवराव उभे करण्यासाठी लोकचळवळही उभी राहिली. कदाचित केशवरावसह आणखी एखादे थिएटर कोल्हापुरात उभे राहील. पुद्दुचेरीतही कदाचित असेच घडेल, परंतु याने विस्थापनाचे भय कमी होईल काय? अनास्थेचे मळभ सरेल काय?

अर्थात सगळेच काही निराशादायक चाललेले नाही. भविष्यातल्या नाटकाची घरे ठरावीत अशा जागाही महाराष्ट्रात तुरळक का असेना, निर्माण होत आहेत. महत्त्वाचा भाग असा की, त्या नाटक करणाऱयांकडून निर्माण होत आहेत. त्या शासनावर अवलंबून नाहीत. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखभालीचा आणि निधीचा टेकू लागत नाही. नाटक करणारेच या जागा जगवतील, विकसित करतील. दिव्याने दिवा पेटावा तशी या घरांच्या निर्माणाची प्रेरणा सबंध महाराष्ट्रभर पसरेल. उत्सवापलीकडची आणि सातत्याने, दीर्घकाळ सर्जन प्रक्रिया साधू पाहणाऱया नाटय़ समूहांना, संस्थांना या घरांचा मोठाच दिलासा असेल. या घरांना नाटकाची आणि नाटक करणाऱयांची निकड-ऊर्मी पूर्णत कळलेली, उमगलेली असेल. कोणी असेही म्हणेल की, उत्सव करायचेच नाहीत काय? उत्सवांमधून काहीच हाताला लागत नाही काय? अर्थातच तसे नाही. एकेकाळी जसे गणेशोत्सवांमधल्या मेळ्यांनी-गाण्यांनी-नाटकांनी महाराष्ट्राचे मन-बुद्धी-कान संस्कारित केलेले आहेत, तसे नाटय़ स्पर्धांनीही केलेले आहेच. परंतु मुद्दा असा की, कोणत्याही आनंदाने-जल्लोषाने करण्याच्या उत्सवाकडे जाण्याआधी आपण सावधपणे जगलेले असू तर उत्सव अधिक सुफळ होतात. दोन उत्सवांमध्ये आपण जगण्याचे आणि कलेचे काय करतो यावर उत्सवांचे मोल ठरते. या मधल्या काळात ‘नाटकाची घरे’ नाटकाला सजीव, समृद्ध, वर्धिष्णू करत राहतात. म्हणून ती मोलाची आणि अपरिहार्य असतात.

[email protected]
(लेखक नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)